पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तब्बल ५८ दिवसांनी बावधन पोलिसांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टात ११ जणांवर तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र सोमवारी (दि. १४) दाखल झाले. यात सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी होते. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापल्यामुळे सर्वांचेच या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ‘वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती’ असा धक्कादायक दावा करीत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता.
तसेच, ‘तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडण्यात आले होते, ज्यात तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून येते,’ असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले. अखेर आरोपीच्या वकिलांनी केलेले दावे फोल ठरले असून, पोलिसांनी केलेल्या तपासात ११ जणांविरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. या ११ जणांविरुद्ध सोमवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत या प्रकरणात पाच आरोपी जामिनावर बाहेर असून, सहा जण कारागृहात आहेत. हा संवेदनशील गुन्हा असल्याने पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. १५) हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.