लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा संशयित अटकेत;दिल्ली येथे वाकड पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:58 IST2025-10-28T17:58:29+5:302025-10-28T17:58:56+5:30
- मॅट्रिमोनियल वेबसाईटवर खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा संशयित अटकेत;दिल्ली येथे वाकड पोलिसांची कारवाई
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेची फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयिताला वाकड पोलिसांनी अटक केली. दिल्ली येथून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन ही कारवाई केली.
आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. शास्त्रीनगर, जयपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संशयिताने विविध विवाह वेबसाईटवर खोट्या ओळखीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २७ सप्टेंबर २०२५ रोजी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आलोक पुरोहित याने जीवनसाथी डाॅट काॅम, शादी डाॅट काॅम आणि आयआटीएमशादी डाॅट काॅम या विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत पुण्यात येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. यानंतर संशयिताने फिर्यादीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमक्या देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “तक्रार केल्यास फोटो सोशल मीडियावर प्रसारित करीन,” अशी धमकी देत संशयिताने तिचा मानसिक छळ केला होता.
या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्पर कारवाई करत दिल्ली येथून पुरोहित याला ताब्यात घेऊन ७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यास अटक केली.
तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहित असल्याचे समोर आले असून, तो विविध मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीच्या आधारे महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर महिलांनाही संशयिताने अशाच प्रकारे फसविल्याचे समोर आले आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, तसेच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसऱ्या पत्नीलाही फसविले
संशयित पुरोहित हा विविध कंपन्या व आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम करतो. त्याचे मुंबई येथे एक कार्यालय असल्याचेही समोर आले आहे. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर दुसरे लग्न केले. मात्र, त्यानंतरही त्याने विविध संकेतस्थळांवर नाव नोंदणी करून अनेक महिलांची फसवणूक केली. याबाबत त्याच्या दुसर्या पत्नीला माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
उच्चशिक्षित महिलांची फसवणूक
संशयित पुरोहित याची पहिली आणि दुसरी पत्नीही खासगी कंपनीत उच्चपदावर नोकरी करतात. तसेच विविध संकेतस्थळांवरून उच्चशिक्षित महिलांशी संपर्क साधून त्यांना लग्नाचे आमिष देतो आणि त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संशयित पुरोहित याला बेड्या ठोकल्या असून फसवणूक झालेल्या महिलांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.