परदेशातून पुरविला जात होता गांजा; हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:33 IST2026-04-10T16:32:39+5:302026-04-10T16:33:01+5:30
- हायड्रोपोनिक गांजा परदेशातून एक जण मुख्य संशयिताला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

परदेशातून पुरविला जात होता गांजा; हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
पिंपरी : शहरातील गांजा तस्करीला लगाम लावण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. गुन्हे शाखा युनिटने हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन जणांना सव्वामहिन्यापूर्वी अटक केली होती. आता या तिघांना गांजा पुरविणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हायड्रोपोनिक गांजा परदेशातून एक जण मुख्य संशयिताला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
रोहित किशोर सुकेजा (वय ३४, रा. अशोका हाइटस, पिंपरी कॅम्प), असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे साथीदार अक्षय विजय मंथान (वय २८, रा. पीयूष पार्क, पिंपरीगाव), मयूर धनश्याम कपाटे (वय २५, रा. अशोकनगर, पिंपरी), प्रतीक राकेश खैरनार (वय २७, रा. मुकाईनगर, हिंजवडी) यांना यापूर्वी अटक केली आहे.
शहरात प्रामुख्याने गांजा मध्य प्रदेश व ओरिसा येथून येत असल्याचे तपासात वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. या गोष्टींना आळा घालण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
परदेशातूनही गांजा पुरवीत असल्याचे निष्पन्न
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २५ फेब्रुवारी रोजी काळेवाडी येथे पाटीलवाडा हॉटेलकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर अक्षय, मयूर आणि प्रतीक या तिघांना हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले होते. त्यांच्याकडून २६.७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ९३ ग्रॅम साधा गांजा आणि एक दुचाकी, असा ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत रोहित सुकेजा हा गांजा पुरवीत असल्याचे समोर आले. पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर ५ एप्रिलला त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. रोहितचे हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचे रॅकेट असून, तो मुंबईतून गांजा आणायचा, तसेच त्याला परदेशातूनही एक जण हा गांजा पुरवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.