फेक मेसेज करून १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्यास गुजरातमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:18 IST2025-05-17T15:16:30+5:302025-05-17T15:18:24+5:30
- कंपनीच्या अकाउंटंटला संचालक असल्याचे भासवले : एक कोटीची रक्कम ‘होल्ड’ करण्यात यश

फेक मेसेज करून १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्यास गुजरातमधून अटक
पिंपरी : भोसरी एमआयडीसीमधील कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून संचालक असल्याचे भासवून क्लायंटला पेमेंट करायचे सांगत एक कोटी ९५ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी गुरुवारी (१५ मे) गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी २४ तासांत संशयितास गुजरातमधून अटक केली. गुन्ह्यातील एक कोटीची रक्कम ‘होल्ड’ करण्यात पोलिसांना यश आले आहे. जेनील वसंतभाई वाघेला (२२, कामरेज सुरत, गुजरात), असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरीमधील एका कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून मेसेज करणारी व्यक्ती कंपनीची संचालक असल्याचे भासवण्यात आले. फेक मेसेजद्वारे कंपनीला क्लायंटला तत्काळ पैसे द्यायचे असल्याचे सांगून एका बँक खात्यावर एक कोटी ९५ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडले. कंपनीच्या खऱ्या संचालकांना खात्यावरून पैसे गेल्याचा मेसेज गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अकाउंटंटने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला.
सायबर पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांची दोन पथके तयार केली. गुन्ह्यात वापरलेले बँक खाते आणि इतर संबंधित माहिती पोलिसांनी काढली. संशयितांनी गुन्ह्यातील काही रक्कम वेगवेगळ्या खात्यावर वळवल्याचे निदर्शनास आले. काही रक्कम सुरत जिल्ह्यातील कामरेज येथून काढली जात असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुजरात येथे जाऊन तत्काळ जेनील वाघेला याला ताब्यात घेतले. त्याने त्याचा साथीदार प्रिन्स विनोदभाई पटेल, नकुल खिमाने यांच्याशी संगनमत करून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, प्रवीण स्वामी, प्रकाश कातकाडे, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे, सौरभ घाटे, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, जयश्री वाखारे, स्मिता पाटील यांच्या पथकाने केली.