हिंजवडी : हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दिवाळीचा बोनस कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून चालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांना संपविल्याचे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट आले. जनार्दन हंबर्डीकर (वय ५७, रा. वारजे) या चालकास पोलिसांनीअटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाली होती. सकाळी आठच्या सुमारास चालक हंबर्डीकरच्या पायाखालील बाजूस आग लागली. त्यामुळे चालत्या बसबाहेर उड्या घेतल्याने चालकासह नऊ जण बचावले. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस बसलेल्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कशामुळे घडले?बसला आग कशामुळे लागली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी शॉर्टसर्किटने ती लागली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कामगारांकडे आणि कंपनीत चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. बसचालक जनार्दन हंबर्डीकर याचा बसमधील कर्मचाऱ्यांशी वाद होता. ते त्याला मजुरांचे काम सांगत. त्यामुळे दररोज बसमध्येही वाद होत असे. शिवाय दिवाळीमध्ये त्याला बोनस दिला नव्हता आणि वेतन कापले होते. त्या रागातून त्याने बस पेटवून दिली. सर्वच कर्मचाऱ्यांना मारण्याचा त्याचा कट होता.कंपनीतून बेंझिन आणले, वारजेतून काडीपेटी घेतलीचालक हंबर्डीकर याने नियोजनबद्ध कट रचून हा प्रकार घडवून आणला. व्योम ग्राफिक्स ही मुद्रण व्यवसाय करणारी कंपनी असून, त्याने कंपनीतून मंगळवारी बेंझिन नावाच्या रसायनाचा कॅन बसमधील सीटजवळ आणून ठेवला. टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही सीटखाली आणून ठेवल्या होत्या. बुधवारी सकाळी वारजे येथून काडेपेटी घेतली. हिंजवडीत आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना बस थांबवून त्याने काडीपेटीने चिंध्या पेटविल्या.सीसीटीव्हीत थरार ‘कैद’हा थरार रस्त्याकडेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हंबर्डीकरने बस थांबवून चिंध्या पेटविल्यानंतर चालकाच्या मागील बाजूस बसलेल्यांना धूर आणि आग दिसताच त्यांनी दरवाजातून उड्या मारल्या. रसायनामुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. पँट पेटल्याने हंबर्डीकरनेही बाहेर उडी मारली. बस हेलकावत बाजूच्या कठड्याला जाऊन धडकली व थांबली. त्यावेळी सर्वांत मागे बसलेल्या चौघांशिवाय इतरही खिडक्यांतून बाहेर पडले. हंबर्डीकरला इतर जखमींसोबत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गुरुवारी सखोल चौकशीत ही आग लागली नाही तर लावण्यात आल्याच्या संशय बळावल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.यांचा गेला नाहक बळीयात सुभाष सुरेश भोसले (वय ४४, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे), शंकर कोंडिबा शिंदे (५८, रा. सिद्धिविनायक आंगण सोसायटी, नऱ्हे), गुरुदास खंडू लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजन ऊर्फ राजू सिद्धार्थ चव्हाण (४०, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रूक) यांचा मृत्यू झाला.यांचा बचावला जीवसंदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबूराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.
'त्या' माहितीमुळे हिंजवडी जळीत कांडाचा चालकच मुख्यआरोपी असल्याचा पोलिसांना आला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:08 IST