Pune Crime | १ टक्का नफा देण्याचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 15:18 IST2023-02-04T15:18:00+5:302023-02-04T15:18:18+5:30
फसव्या स्किममधून व्यावसायिकाची फसवणूक...

Pune Crime | १ टक्का नफा देण्याचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर दररोज एक टक्का जास्तीचा नफा मिळेल, अशी फसवी स्किम सांगितली. त्यानंतर विश्वास संपादन करून व्यावसायिकाला चार लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र गुंतवलेली रक्कमही परत न करता व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार १२ एप्रिल २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला.
शशिकांत राजाराम देसाई (वय ५०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आळंदी येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने ओथ्री ऑस्सम प्रा. ली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिदिवस एक टक्का जास्तीचा नफा मिळवून देण्याची स्कीम देसाई यांना सांगितली. त्यावर विश्वास ठेवून देसाई यांनी चार लाख रुपये गुंतवले. दररोज एक टक्का नफा मिळणाऱ्या स्कीममध्ये पाच वर्षांत देसाई यांना त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेतून १० हजार २०० रुपये परत मिळाले. उर्वरित तीन लाख ८९ हजार ८०० रुपये मुद्दल आणि त्यावरील नफा न देता त्यांची आरोपीने फसवणूक केली.