फसवणुकीची चिनी ‘लिंक’; सायबर ठगांकडून १५० भारतीयांना २५ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:09 IST2025-09-27T16:08:23+5:302025-09-27T16:09:03+5:30
- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, सहाजणांना ठोकल्या बेड्या

फसवणुकीची चिनी ‘लिंक’; सायबर ठगांकडून १५० भारतीयांना २५ कोटींचा गंडा
पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून फायद्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सहाजणांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून संशयित हे फसवणुकीची रक्कम क्रिप्टो आणि युएसडीटीच्या माध्यमातून पाठवत होते. त्यांनी १५० ते १६० नागरिकांची २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
यश भारत पाटोळे (वय २५, कोल्हापूर), अब्दुल माजिद शेख (३४, उंड्री, पुणे), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेहुन (३०, बिहार), माझ अफसर मिर्झा (२४, स्वारगेट, पुणे), हुसेन ताहीर सोहेल शेख (२३, छत्रपती संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (४१, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फार्मा कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला फेसबुकवर शेअर मार्केटसंदर्भात जाहिरात दिसली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दररोज १० ते २० टक्के नफा मिळेल, असे जाहिरातीतून सांगितले. जाहिरातीमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीला वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी केले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ८ ते २५ टक्के नफा मिळण्याचे आमिष दाखवले. लिंक पाठवून ट्रेडिंग ॲपवर ८९ लाख ३५ हजार ३०५ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेवर ८ कोटी ७१ लाख रुपये नफा झाल्याचे दाखवले. फिर्यादीने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणखी पैशांची मागणी केली. गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
संशयितांनी एका बँक खात्यावर ३३ लाख ८६ हजार रुपये घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेत यश पाटोळे याची ओळख पटवली. पुण्यातील कोंढवा येथून त्याला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये बसून चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांशी संपर्क साधत सायबर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी आणखी पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन, १५ सिमकार्ड, चार सीसीटीव्ही, आठ चेकबुक, २० एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक मेमरी कार्ड, एक पासपोर्ट आणि १३ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त केले.
संशयित हे चिनी नागरिकांसोबत मिळून भारतात सायबर फसवणुकीचे गुन्हे करत होते. फसवणुकीची रक्कम ते क्रिप्टो करन्सी आणि युएसडीटीमध्ये कन्व्हर्ट करून चीनमधील संशयितांना पाठवायचे. त्यांच्याकडून मिळणारे कमिशन हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमातून स्वीकारले. त्यांनी आतापर्यंत १५० ते १६० नागरिकांची २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार, हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रवीण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दीपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिंदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, नीलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दीपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.