PSI Exam : मेहनत, जिद्दीच्या जोरावर अजिंक्य झाला पीएसआय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:27 IST2026-04-09T19:27:38+5:302026-04-09T19:27:53+5:30
- नेहरूनगर जवळील विठ्ठलनगर वसाहतीतील अजिंक्य किर्ते यांनी केला दररोज १० ते १२ तास अभ्यास

PSI Exam : मेहनत, जिद्दीच्या जोरावर अजिंक्य झाला पीएसआय
पिंपरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, दिवसाला १० ते १२ तास अभ्यास करून नेहरूनगर जवळील विठ्ठलनगर झोपडपट्टीतील अजिंक्य दयानंद किर्ते याने पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेत यश मिळविले आहे. अजिंक्यने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १२९वा, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गात ५ वा क्रमांक पटकावला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षेत अजिंक्यने यश मिळविले आहे. विठ्ठलनगरच्या झोपडपट्टीत अजिंक्यचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्याचे वडील दयानंद किर्ते हे खासगी कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत असून आई राणी या गृहिणी आहेत. अजिंक्यचे प्राथमिक शिक्षण नेहरूनगर येथील महापालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. पुढे पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करत त्याने आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आयटी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
त्यानंतर हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत नोकरी करत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. शाहूनगर येथील नालंदा फाउंडेशन संचलित नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात अभ्यास केला. यासाठी सखाराम इंगवले, सुरेश कसबे, पीएसआय अमोल खरात, नागेश बामणे व सोनाली कटकधोंड यांचे, तर मैदानी परीक्षेसाठी मंगेश जाधव आणि सुयोग पाटोळे मार्गदर्शन त्याला लाभले.