कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:02 IST2025-02-16T13:57:16+5:302025-02-16T14:02:39+5:30
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांचा निषेध
पिंपरी : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अक्षभ्य आणि निंदनीय वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा निषेध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. खरे तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रमाणे अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. काही शेतकऱ्यांना तर ती मिळतच नाही. त्यातही पीक विम्याची रक्कम महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या रकमेतून दिले जाते. मंत्र्यांच्या खिश्यातून दिली जात नाही. त्यामुळे मंत्र्यांनी अहंकारात राहून ते बेताल वक्तव्य करु नये.
हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, पण सरकारने एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे वादग्रस्त विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तसेच शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
माणिकराव कोकाटे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. त्यांच्या मते, सरकारने शेतकऱ्यांना नाममात्र दरात पीक विमा उपलब्ध करून दिला असला, तरी त्याची उपयुक्तता आणि त्यातील त्रुटी यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, त्यांच्या या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिले.
वादग्रस्त विधानावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले,"माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आखण्याचा माझा हेतू होता. एका रुपयात विमा देणे हे चांगले पाऊल आहे, पण त्याची कार्यवाही योग्य प्रकारे व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे," असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याऐवजी त्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला आहे. शेतकरी संघटनांनीही या वक्तव्याचा निषेध करत कृषिमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.