पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस थांब्यांवर खासगी वाहतूकदारांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:34 IST2025-08-13T17:33:13+5:302025-08-13T17:34:27+5:30

- महामंडळाचे आर्थिक नुकसान : वल्लभनगर, चिंचवड, निगडी, वाकड, नाशिक फाटा, भोसरी येथील थांब्यांना खासगी प्रवासी वाहनांचा विळखा, एजंटांचा मुक्तसंचार 

Private transporters intrude on ST bus stops in Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस थांब्यांवर खासगी वाहतूकदारांची घुसखोरी

पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस थांब्यांवर खासगी वाहतूकदारांची घुसखोरी

- रवींद्र जगधने

पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसथांब्यांवर खासगी प्रवासी वाहतूकदारांची घुसखोरी वाढत चालली आहे. एसटी आगार व एसटी थांब्यापासून २०० मीटरच्या आत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र, वल्लभनगर आगारासह चिंचवड, निगडी, वाकड, नाशिक फाटा, भोसरी येथील एसटी थांब्यांजवळ खासगी प्रवासी वाहने आणि एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे.

वल्लभनगर आगारात एजंटांचा मुक्त संचार असून, प्रवासी वाहतुकीची परवानगी नसलेली वाहने सर्रास दिसत आहेत. विशेष म्हणजे थांब्यांसमोर वाहने लावून प्रवाशांना हाताला धरून घेऊन जातात. राज्यात टप्पा वाहतुकीला फक्त एसटी महामंडळानंतर महापालिकेच्या प्रवासी वाहतूक संस्थेला परवानगी आहे. इतर कोणत्याही प्रवासी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. मात्र, आगार व थांब्यांजवळून खासगी वाहनांतून अशी वाहतूक होत आहे.

चिंचवड, निगडी, नाशिक फाटा, भोसरी आणि वाकड येथील एसटी बस थांब्यांजवळ खासगी वाहतूकदारांनी अड्डे थाटले आहेत. हे वाहतूकदार एसटीच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी दरात सेवा देतात, ज्यामुळे थांब्यांवर गोंधळ आणि गर्दी वाढते. वल्लभनगर आगारात एजंटांची संख्या इतकी वाढली आहे की, ते एसटीच्या अधिकृत सेवांना अडथळा आणतात. प्रवासी वाहतुकीस परवानगी नसलेली वाहने सर्रास रस्त्यावर धावतात. शहरातील मेट्रो स्टेशन आणि बस डेपोबाहेर ऑटो रिक्षांच्या अनधिकृत पार्किंगमुळेही वाहतूककोंडी होत आहे. 

दरातील फरक आणि एसटीचे नुकसान

एसटीच्या शिवनेरी आराम बससाठी वल्लभनगर ते मुंबई तिकीट ५२३ रुपये आहे, मात्र खासगी वाहतूकदार केवळ ४०० रुपयांत प्रवाशांना मुंबईला सोडतात. यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट होते. महामंडळाचे नियोजन कमकुवत असल्याने खासगी वाहने फोफावत आहेत. 

प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात

विमा, योग्य परवानग्या किंवा वाहनांची देखभाल या सुरक्षेच्या मूलभूत सुविधा अवैध वाहनांमध्ये नसतात. स्वस्त दरामुळे प्रवासी या वाहनांकडे वळतात. महामार्गावर अवैध बस पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि जीवितहानीचा धोका वाढतो. प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली जात आहे. 

कारणे आणि उपाययोजना

ही घुसखोरी एसटीच्या कमकुवत नियोजनामुळे वाढते. पोलिस आणि आरटीओ विभागाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत सेवांचा वापर करावा आणि अवैध वाहतुकीची तक्रार नोंदवावी. याबाबत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

अशा वाहनांवर कारवाईचे अधिकार एसटी महामंडळाला नाहीत. मात्र, याबाबत पुणेपिंपरी-चिंचवड आयुक्त, पुणे ग्रामीण अधीक्षक तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.  - अरुण सिया, पुणे विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Web Title: Private transporters intrude on ST bus stops in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.