Hinjewadi Power Outage:हिंजवडी आयटीपार्कमध्ये चोवीस तास बत्ती गुल; याशवीन सोसायटीमधील हजारो नागरिकांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:28 IST2026-04-07T15:26:31+5:302026-04-07T15:28:18+5:30
Hinjewadi Power Outage: हा पुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. या घटनेमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाले.

Hinjewadi Power Outage:हिंजवडी आयटीपार्कमध्ये चोवीस तास बत्ती गुल; याशवीन सोसायटीमधील हजारो नागरिकांची गैरसोय
हिंजवडी - आयटीपार्क फेज दोनमध्ये याशवीन सोसायटीमधील वीजपुरवठा सोमवारी (दि.६) दुपारी बाराच्या सुमारास खंडित झाला. तो पूर्ववत व्हायला चोवीस तास लागले. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो आयटीयन्सना मनस्ताप सहन करावा लागला तर, इमारतीमधील लिफ्ट बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि मुलांना त्रासाला सामोरे जावे लागले.
विद्युत बॅकअप संपल्याने काही महत्वाच्या ठिकाणी डिझेलवर चालणारे विद्युत जनित्र (जनरेटर) वापरावे लागले. मात्र, त्याला सुद्धा चाळीस हजार रुपये खर्च लागल्याने मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड हजारो सोसायटीधारकांना सोसावा लागला. याशविन सोसायटीधारकांनी मंगळवारी (दि.७) सकाळी प्रवेशद्वारावर एकत्र येत मेट्रो आणि महावितरण विरोधात संताप व्यक्त केला. दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे वादळी वारा, पाऊस किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती कारण नसून, सोसायटीजवळच मेट्रो स्टेशनसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे विद्युत केबल्स तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजते. तर, मेट्रो अधिकाऱ्यांना महावितरणकडून परिसरातील वीज वाहिन्या संदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा खोदकाम करताना केबल्स तुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांसह महावितरण विभाग सुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
हिंजवडी फेज २ मधील यशवीन सोसायटीत तब्बल चोवीस तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले. लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले, तर, बॅकअप संपल्याने रहिवाशांना रात्र अंधारात व उकाड्यात काढावी लागली. उन्हाळ्यामुळे अन्नपदार्थ, दूध व भाज्या खराब झाल्या. - अपर्णा कराळे, फेडरेशन सदस्य यशवीन बी, विंग
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने, कॉमन एरिया लाइट आणि लिफ्टसाठी ४०० लीटर डिझेलचा खर्च झाला. विजेविना रात्रभर राहून डिझेलचा भुर्दंड भरावा लागला. हा प्रकार आजचा नाहीतर, निरंतर आम्हाला मेट्रो कामामुळे त्रास होत आहे - संदीप शेवाळकर : ए विंग, यशवीन सोसाइटी, माण
फेज दोन याठिकाणी मेट्रो स्टेशनसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे, विद्युत केबल्स तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. खूप खोलवर काँक्रीट आणि दगड खाली केबल्स अडकल्याने वेळ लागला मात्र, सध्या, वीजपुरवठा सुरळीत केला आहे. मेट्रोच्या कामाचा यापूर्वी सुद्धा अनेकदा फटका बसला आहे. - येनगे. एन. बी. : सहायक अभियंता, एमएसईबी, हिंजवडी विभाग