गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त
By नारायण बडगुजर | Updated: December 7, 2023 18:02 IST2023-12-07T18:02:27+5:302023-12-07T18:02:56+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. ६) दुपारी पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे ही कारवाई केली

गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त
पिंपरी : विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून साडेसात किलो गांजा जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. ६) दुपारी पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे ही कारवाई केली.
जितेंद्र मगन कोळी (३३, रा. शिरपूर, धुळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार कपिलेश इगवे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर थांबला होता. त्याच्याजवळ गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाचे कपिलेश इगवे यांनी घटनास्थळी जाऊन जितेंद्र कोळी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सात लाख ४३ हजार ८०० रुपयांचा सात किलो ४३८ ग्रॅम वजनाचा गांजा व १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण सात लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हा तेथे गांजा विक्रीसाठी आल्याचे तपासात उघड झाले आहे.
जितेंद्र कोळी याने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याचे चौकशीतून समोर आले. त्यानुसार त्याच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अनिरुद्ध सावर्डे तपास करीत आहेत.