पतपेढीतील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून सात महिन्यांनंतरही गुन्हा दाखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:07 IST2025-10-08T10:07:03+5:302025-10-08T10:07:17+5:30
- संस्थेचे सुमारे १५० सभासद आहेत. मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले असून, दोन ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची माहिती सभासदांनी दिली.

पतपेढीतील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून सात महिन्यांनंतरही गुन्हा दाखल नाही
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील सेंट्रल व्हेइकल वर्कशॉप (म.रा.वि.मं.) कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये ४ कोटी ४१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सात महिने उलटूनही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ही पतपेढी स्थापन केली आहे. संस्थेचे सुमारे १५० सभासद आहेत. मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले असून, दोन ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची माहिती सभासदांनी दिली. निवृत्तीनंतर पेन्शनसारखा आधार मिळावा या उद्देशाने अनेक कर्मचाऱ्यांनी या संस्थेत गुंतवणूक केली होती. घोटाळ्याबाबत १२ सभासदांनी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे संस्थेचे २००७ ते २०२२ या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले, ज्यात अपहार झाल्याचे उघड झाले. या विश्वासघातामुळे ठेवीदार हतबल झाले आहेत.
या प्रकरणी सहकार विभागाच्या वतीने वर्ग दोनचे विशेष लेखापरीक्षक राजेंद्र कांबळे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी उपनिबंधकांना अहवाल सादर केला. त्यानंतर १४ फेब्रुवारीला त्यांना एफआयआर दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार, १७ फेब्रुवारीला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी लेखापरीक्षकांनी पत्र दिले. मात्र, तब्बल सात महिने उलटूनही गुन्हा नोंद झालेला नाही.
या गैरव्यवहारात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे अहवालात नमूद आहे. सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले असून, आता पोलिस गुन्हा कधी दाखल करतील, असा प्रश्न ठेवीदार विचारत आहेत.