पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:10 IST2020-03-15T15:08:13+5:302020-03-15T15:10:05+5:30
भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला.

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव पीएमपीएमएल बसने दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-बंगळुरू महामार्गावर पाषाण तलावासमोर बावधन येथे शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
मृदुल तरुण सिंघल (वय २५, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील तरुण विद्याभूषण सिंघल (वय ६२) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएमपीएमएल बसवरील चालक उल्हास रामचंद्र सरफाले (वय ४६, रा. सोंडे हिरोंजी, ता. वेल्हे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उल्हास पीएमपीएमएलची बस घेऊन हिंजवडीकडून पुण्याकडे जात होता. या भरधाव बसने मृदुल याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मृदुल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.