सावकारांच्‍या जाचाला कंटाळून कुटुंबाची सामूहिक आत्‍महत्‍या, पत्‍नी,मुलाचा मृत्‍यू, पती जखमी

By नारायण बडगुजर | Updated: January 18, 2025 17:09 IST2025-01-18T17:09:16+5:302025-01-18T17:09:45+5:30

Crime News: सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील पत्‍नी आणि मुलाचा मृत्‍यू झाला. तर पती जखमी असून रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

Pimpri News: Family commits mass suicide due to harassment by moneylenders, wife, child dead, husband injured | सावकारांच्‍या जाचाला कंटाळून कुटुंबाची सामूहिक आत्‍महत्‍या, पत्‍नी,मुलाचा मृत्‍यू, पती जखमी

सावकारांच्‍या जाचाला कंटाळून कुटुंबाची सामूहिक आत्‍महत्‍या, पत्‍नी,मुलाचा मृत्‍यू, पती जखमी

- नारायण बडगुजर
पिंपरी - सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील पत्‍नी आणि मुलाचा मृत्‍यू झाला. तर पती जखमी असून रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. चिखली येथील सोनवणे वस्‍तीत ही धक्कादाय घटना उघडकीस आली. २०१६ ते १८ जानवोरी २०२५ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी महिलेसह चौघांच्या विरोधात गुन्‍हा दाखल केला.

शुभांगी वैभव हांडे (वय ३६) आणि धनराज वैभव हांडे (९) अशी आत्‍महत्‍या केलेल्‍यांची नावे आहेत. शुभांगी यांचे पती वैभव मधुकर हांडे (४५, सर्व रा. सोनवणे वस्‍ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. संतोष कदम, संशयित महिला (दोघेही रा. ताथवडे), संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद खान (रा. मोई, ता. खेड) यांच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक विठ्‌ठल साळुंके यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संतोष कदम याच्‍याकडून फिर्यादी वैभव यांनी सहा लाख रुपये दरमहा १० टक्‍के व्‍याजाने घेतले होते. संशयित महिलेकडून दोन लाख रुपये १० टक्‍के दरमहा व्‍याजाने घेतले होते. जावेद खान याच्‍याकडून चार लाख रुपये व्‍याजाने घेतले होते. त्‍याबदल्‍यात संतोष कदम याला त्‍याच्‍या मुद्‌दल रकमेची परतफेड करून नऊ लाख ५० हजार रुपये दिले होते. तसेच फिर्यादी वैभव यांच्‍या नावावर असलेली एक एकर जमीनही लिहून दिली होती. संशयित महिलेला दरमहा २० हजार रुपये देऊन स्‍वतःच्‍या मालकीची २० गुंठे जमीन लिहून दिली होती. तरी देखील संशयित महिलेने १४ लाख रुपये दिल्‍याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला.

संशयित जावेद खान याने दिलेल्‍या कर्जापोटी व्‍याज म्‍हणून चार लाख ५० हजार रुपये त्‍याला दिले. संशयित संतोष पवार याच्‍याकडूनही साडेसात लाख रुपये घेतले होते व त्‍यापैकी बहुतांश रक्‍कम परत दिली होती. तरी देखील संशयितानी व्‍याजाचे पैसे देण्‍यासाठी तगादा लावला. फिर्यादी वैभव हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्‍यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

सामूहिक आत्महत्या
सावकारांच्‍या या त्रासाला कंटाळून त्‍यांनी सामुहिक आत्‍महत्‍या करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांच्‍याच मेडिकलमधून झोपेच्‍या गोळ्या खाल्‍ल्‍या. तसेच तिघांनीही छताच्‍या पंख्‍याला गळफास घेतला. या घटनेत पत्‍नी शुभांगी व मुलगा धनराज यांचा मृत्‍यू झाला.

मुलाला पाठविली सुसाइड नोट
फिर्यादी वैभव यांच्‍या १४ वर्षीय मुलाला त्‍यांनी मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍यांनी शुक्रवारी सकाळी आपल्‍या मुलाच्‍या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली होती. रात्री मुलाने ही सुसाइड नोट पाहिली असता त्‍यांनी आपल्‍या पालकांना फोन केला. मात्र त्‍यांनी उचलला नाही. त्‍यामुळे त्‍याने शेजार्‍यांना फोन केला. त्‍यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्‍याने त्‍यांनी रात्री पोलिसांना पाचारण केले. त्‍यानंतर आत्‍महत्‍येचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्‍या तत्‍परतेमुळे वाचले प्राण
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. फिर्यादी वैभव हे जिवंत असल्‍याचे दिसून येताच त्‍यांनी त्‍वरित त्‍यांना रुग्‍णालयात दाखल केल्‍याने त्‍यांचे प्राण वाचले.

Web Title: Pimpri News: Family commits mass suicide due to harassment by moneylenders, wife, child dead, husband injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.