पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:57 IST2025-05-10T14:56:38+5:302025-05-10T14:57:11+5:30
अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते

पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी नदीमध्ये भराव टाकून अरुंद करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर जलसंपदा विभागाने महापालिकेला तिसऱ्यांदा नोटीस दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या बाजूने मुळा नदीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी वृक्षतोड आणि नदीमध्ये भराव टाकून काम सुरू आहे. याविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी आवाज उठवला आहे. जलसंपदा विभागाने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने महिन्याभरात तिसऱ्यांदा महापालिकेला नोटीस देण्यात आली आहे.
काय आहे नोटिशीमध्ये..?
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी महापालिकेला दिलेली नोटीस अशी; मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव करून राडारोडा टाकल्याचे व नदीच्या क्षेत्रामधील जागेत अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. भराव करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे. याबाबत आधी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हा भाग मुळा नदीच्या निषिद्ध क्षेत्रामध्ये येत आहे. अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब अत्यंत गंभीर असून, अतिक्रमण व भराव ताबडतोब स्वखर्चाने काढून टाकावा व नदीची जागा पूर्वस्थितीत करून द्यावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पूर आल्यानंतर महापालिका जबाबदार
नदी प्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही, नदीची वहन क्षमता कमी होणार नाही व नदीच्या काटछेदात कोणताही बदल होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रवाहाला अडथळा आणणाऱ्या बांधकामाविरुद्ध मुख्य अभियंता कारवाई करतील. संभाव्य पुरामुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीस संबंधित विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार राहील, असे नोटिशीत म्हटले आहे.