पिंपरी महापालिकेमध्ये गदारोळातच झाला संतपीठाचा विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:36 IST2019-02-04T17:30:22+5:302019-02-04T17:36:36+5:30
टाळगाव चिखली येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठा'चा विषय गदारोळातच मंजूर झाला...

पिंपरी महापालिकेमध्ये गदारोळातच झाला संतपीठाचा विषय मंजूर
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठा'चा विषय गदारोळातच महापौर राहुल जाधव यांनी मंजूर केला. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ सुरू असताना सभा तहकूब न करता महापौर जाधव खुर्ची सोडून उठून गेले.
महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव आहेत. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर आंदोलन केले. नगरसेवकांनी संत पीठात भ्रष्टाचार झाल्याचे फलक हातामध्ये घेतले होते. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, राजू बनसोडे, समीर मासुळकर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर सहभागी झाले होते.
विरोधी पक्षनेते दत्ता साने संत पीठावर बोलत होते. विकासकामतील होणाया रिंग बाबत बोलत असताना माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यांना मध्येच अडविले. साने यांनी संत पीठावर बोलावे, असे काळजे म्हणाले. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. महापौरांसोबत वादावादी सुरू असतानाच महापौर जाधव यांनी अचानक संत पिठाचा विषय मंजूर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.
सभा तहकूब केल्याचे जाहीर न करताच महापौर राहुल जाधव खुर्चीवरून उठून गेले. दरम्यान, सभा एक तास तहकूब केल्याचे नगरसचिवांनी सांगितले.