‘जलसंपदा’चे १५ टक्के पाणीकपातीचे पत्र; पण महापालिकेचा ‘वेट अँड वॉच’ फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:33 IST2026-04-10T11:32:35+5:302026-04-10T11:33:22+5:30
पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिवसाआड पाणीकपातीचे वेळापत्रक ‘जैसे थे’ : सध्याचा एकत्रित पुरवठा पुरेसा असल्याचा प्रशासनाचा दावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक स्थिती

‘जलसंपदा’चे १५ टक्के पाणीकपातीचे पत्र; पण महापालिकेचा ‘वेट अँड वॉच’ फॉर्म्युला
पिंपरी : जलसंपदा विभागाने १५ टक्के पाणी कपातीचे पत्र पाठवले असले तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सद्य:स्थितीत कोणतीही नवी कपात न करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. पवना, आंद्रा धरणांतील उपलब्ध साठा, सध्याचे दिवसाआडचे वेळापत्रक आणि शहराच्या विद्यमान गरजा लक्षात घेता प्रशासनाने पुरवठा पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नळाच्या वेळेत किंवा दाबात सध्या कोणताही बदल होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने घेतलेल्या अंतर्गत आढाव्यानुसार शहराला पवना, आंद्रा आणि एमआयडीसीकडून मिळणारा एकत्रित पुरवठा सध्या पुरेसा आहे. त्यात आधीपासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने वितरणावर नैसर्गिक नियंत्रण आहे, असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे. परिणामी, जलसंपदा विभागाच्या पत्रानंतरही महापालिकेने आताच्या क्षणी अतिरिक्त पाणी कपात आवश्यक नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
या निर्णयामागे पवना धरणातील उपलब्ध साठा आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक स्थिती हे दोन प्रमुख आधार मानले जात आहेत. शहराचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात उन्हाळ्याच्या या टप्प्यावरही ४५ टक्के इतका पुरेसा साठा असल्याने जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे नव्या कपातीऐवजी सध्याचेच दिवसाआडचे वेळापत्रक कायम ठेवण्यात आले आहे.
शहराला ६६० एमएलडी पाणीपुरवठा
महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेनुसार शहराला पवना धरणातून ५३० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी, तर एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी मिळते, म्हणजेच रोज एकूण ६६० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दुसरीकडे शहराची वास्तविक गरज ७२० ते ७५० एमएलडी इतकी पोहोचली आहे. दररोज किमान ६० ते ९० एमएलडी तूट अजूनही कायम आहे. भामा-आसखेडची १६७ एमएलडी योजना अजून रखडली आहे, तसेच वितरण यंत्रणेतील अपुऱ्या लाईन्स आणि पंपिंग क्षमतेचा मुद्दा पुढे केला जात आहे.
सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
एक दिवसाआड पाणीपुरवठा मे २०१९ पासून सुरू झाला. सुरुवातीला तो केवळ उन्हाळी टंचाईपुरता असल्याचे सांगितले गेले. नंतर नोव्हेंबर २०१९ पासून समन्यायी वाटप या नावाखाली तो कायम ठेवण्यात आला. आज सात वर्षांनंतरही तीच व्यवस्था सुरू आहे. पवना धरण अनेकदा १०० टक्के भरले, तरी शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत नाही.
पाणी गळती ४० टक्के
महापालिकेच अधिकाऱ्यांनी पूर्वी मान्य केल्याप्रमाणे शहरात ३८ ते ४० टक्के पाणी गळती आहे. पवना-आंद्रातून उचललेले प्रत्येक १०० लिटरमागे ४० लिटर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचतच नाही. जुनी जलवाहिनी, अनधिकृत नळजोड, कमी दाब आणि अपूर्ण झोनल नेटवर्क यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा दृष्टिक्षेपात...
- मुख्य जलस्रोत - पवना धरण : ५३० एमएलडी
- आंद्रा धरण पुरवठा : १०० एमएलडी
- एमआयडीसीकडून पुरवठा : ३० एमएलडी
- शहरासाठी एकूण उपलब्ध पाणी : ६६० एमएलडी
- शहराची दररोजची मागणी : ७२० ते ७५० एमएलडी
- दैनंदिन तूट : ६० ते ९० एमएलडी
- शहरातील पाणी गळती : ३८ ते ४० टक्के
धरणातील पाणीसाठा (कंसात मागील वर्षीची एप्रिलमधील स्थिती)
- पवना धरणातील सध्याचा साठा : ४६ टक्के (४२.५४ टक्के)
- आंद्रा धरणातील पाणीसाठा : ५३.६८ टक्के (४९ टक्के)
- भामा आसखेड पाणीसाठा : ६२.३७ टक्के (५६.३० टक्के)
पाणीकपातीबाबत महापालिकेस जलसंपदा विभागाचे पत्र मिळालेले नाही. सकाळी वर्तमानपत्रांतूनच त्याबाबत माहिती वाचली. सद्य:स्थितीत पवना धरणामध्ये ४५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपात करण्याची गरज नाही. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका