Pune Crime: पिंपरी - चिंचवडमध्ये तिघांकडून नऊ वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:42 IST2021-11-07T19:42:40+5:302021-11-07T19:42:50+5:30
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Pune Crime: पिंपरी - चिंचवडमध्ये तिघांकडून नऊ वाहनांची तोडफोड
पिंपरी : अनोळखी तीन जणांनी दगडाने नऊ वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाच्या खिशातील ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आहेर गार्डन मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. ६) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत रोहिदास कसबे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहन चालक आहेत. त्यांनी त्यांची गाडी वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला तसेच स्पाईन रोडवर देखील काही वाहने पार्क केली होती. आरोपींनी दगडाने या वाहनांची तोडफोड केली. यात मिनी बस तसेच काही चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनांच्या तोडफोडीची बाब फिर्यादीच्या निदर्शनास आली. त्यामुळे फिर्यादी घटनास्थळी आले.
आरोपींनी फिर्यादीच्या देखील वाहनाची दगड मारून तोडफोड केली असल्याचे फिर्यादीला दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने त्यांना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादीला धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीच्या खिशातून ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय गरुड तपास करीत आहेत.