पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी महामार्गावरून पळविली पार्क केलेली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 14:55 IST2020-11-09T14:51:16+5:302020-11-09T14:55:09+5:30
अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली..

पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी महामार्गावरून पळविली पार्क केलेली बस
पिंपरी : वाहनचोरीच्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, वाहनचोरीचे प्रकार रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्रास चोरी होत असतानाच वाहनचोरट्यांनी अवजड वाहनांकडे देखील मोर्चा वळविला आहे. पिंपरी येथे महामार्गावर पार्क केलेली बस चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
अजमेर राजमहंमद पटेल (वय ३५, रा. कासारवाडी) यांनी याबाबत रविवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी खासगी बसचे चालक आहेत. फिर्यादी यांनी २९ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील शेल पेट्रोल पंपावर बस लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आला.
अवजड वाहनधारक धास्तावले
वाहनचोरीच्या घटना वाढत असतानाच अवजड वाहने चोरून नेल्याचे प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे अजवड वाहनांचे मालक धास्तावले आहेत. अवजड वाहने रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत पार्क केली जातात. ही वाहने काेठेही घेऊन जाणे सहज शक्य होत नाही. मात्र चोरटे अशा वाहनांचीही चोरी करीत आहेत.