‘मी दिघीतला भाई’ म्हणत,चाकू दाखवून पसरवली दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:15 IST2025-05-07T18:14:30+5:302025-05-07T18:15:18+5:30
भंगार व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

‘मी दिघीतला भाई’ म्हणत,चाकू दाखवून पसरवली दहशत
पिंपरी : भंगार व्यावसायिकाला दोन संशयितांनी दमदाटी करत दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने दुकानात गोंधळ घालून चाकू दाखवून धमकी दिली. दिघी येथे २ मे आणि ४ मे रोजी ही घटना घडली.
हिरामन बबन सूर्यवंशी (५८, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. ६) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बादशहा भोंड आणि संंग्रामसिंग गजलसिंग भादा (दोघेही रा. दिघी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित भादा याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आर्यन इंडस्ट्रीज या नावाच्या भंगार दुकानात संशयित आले. २ मे रोजी संशयित बादशहा याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने शिवीगाळ केली आणि ‘पैसे दिले नाहीस तर तुझे दुकान चालू देणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने ५०० रुपये घेऊन निघून गेला.
यानंतर, ४ मे रोजी संग्रामसिंग हा दुकानावर आला. त्यानेही दारू पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने गोंधळ घालत ‘उद्यापासून दुकान उघडायचं नाही, उघडलेस तर फोडून टाकीन’ अशी धमकी दिली. गर्दी जमा झाल्याचे पाहून त्याने कमरेतील चाकू बाहेर काढला आणि हवेत फिरवत ‘मी दिघीचा भाई आहे, मला ओळखत नाहीस का?” असे म्हणत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. संशयिताने दमदाटी करत पुन्हा ५०० रुपये घेऊन घटनास्थळावरून निघून गेला.