सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:29 IST2025-04-11T15:28:28+5:302025-04-11T15:29:43+5:30
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर कामशेत येथे झाले.

सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - रामदास आठवले
पवनानगर : मित्रपक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते आणि सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर कामशेत येथे झाले. यावेळी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते.
यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, अध्यक्ष मातंग आघाडी आण्णा वायदंडे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश परशुराम वाडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, दिलीप काकडे, मंदार भारदे, पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष समीर जाधव, अशोक सरवदे, अंकुश सोनवणे उपस्थित होते. उद्योग आणि व्यवसायाचे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. विजय खरे यांनी पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन केले.
प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारिणीने नियोजन केले. सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी सूत्रसंचालन, कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी प्रास्ताविक केले. मावळ तालुकाध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी आभार मानले.
फक्त बौद्ध समाजच नाही, तर सर्व समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करणे ही पक्षाची भूमिका आहे. पक्ष बांधणीत सर्वांनी योग्य भूमिका बजावली पाहिजे.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री