लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:49 IST2025-08-08T19:46:54+5:302025-08-08T19:49:12+5:30

- लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले.

Pimpri Chinchwad news who will do the work by taking positions of profit? City president pricks ears of office bearers in BJP meeting | लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

पिंपरी : शहरातील भाजप प्रदेश व जिल्हा पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पिंपरीतील पक्ष कार्यालयात बुधवारी (दि ६) झाली. बैठकीस गेल्या पाच वर्षांत लाभाची पदे घेणारे नेते अनुपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी कान टोचले. लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांची तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या बैठका आणि नवीन कार्यकारिणीसाठी मुलाखती सुरू आहेत. बैठकीत गेल्या दोन महिन्यांत झालेल्या कार्यक्रमांचा आढावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी घेतला. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शीतल शिंदे, राजेश पिल्ले, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, शैला मोळक आदी उपस्थित होते. जिल्हा समिती नियुक्त करण्यासाठी ३०० जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
 


पक्षाच्या बैठकीस माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशी लाभाची पदे घेणारे पदाधिकारी उपस्थित नव्हते. याविषयी काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर शहराध्यक्ष काटे म्हणाले, ज्यांनी पक्षसंघटनेत काम करण्यासाठी मुलाखत दिली, त्याच कार्यकर्त्यांना जिल्हा समितीत प्राधान्य दिले जाणार आहे. जे नगरसेवक, ज्यांना लाभाची पदे मिळाली आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी जर पक्षसंघटनेचे काम केले तरच त्यांचा पदासाठी किंवा उमेदवारीसाठी विचार केला जाणार आहे.

कोण कोणाच्या जवळचा हे समीकरण चालणार नाही !

जे संघटनेचे काम करणार नाहीत व उमेदवारी आणि पदाकरिता पुढे-पुढे करतात, त्यांची सर्व माहिती पक्षश्रेष्ठींना कळविली जाईल. त्यामुळे भविष्यात ज्यांना उमेदवारी पाहिजे किंवा लाभाची पदे हवी असतील, त्यांना पक्षसंघटनेत काम करावे लागेल. ‘रिझल्ट’ द्यावा लागेल. पदे किंवा उमेदवारी मिळविण्यासाठी कोण कोणाच्या जवळचा असो किंवा लांबचा हे समीकरण भाजपसारख्या संघटनेत चालत नाही. चालू देणार नाही, असे काटे यांनी सुनावले.

Web Title: Pimpri Chinchwad news who will do the work by taking positions of profit? City president pricks ears of office bearers in BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.