पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ नागरी पतसंस्थांची नोंदणी रद्द; नियमभंग करणाऱ्या संस्थांवर अडीच वर्षांत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:24 IST2025-09-26T12:23:49+5:302025-09-26T12:24:15+5:30
- अनेक पतसंस्था प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार करत नव्हत्या, तर काहींचे पत्तेही शोधून सापडले नाहीत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ नागरी पतसंस्थांची नोंदणी रद्द; नियमभंग करणाऱ्या संस्थांवर अडीच वर्षांत कारवाई
पिंपरी : नियमांचे पालन न करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३५ पतसंस्थांची नोंदणी सहकार विभागाने रद्द केली आहे. संत तुकारामनगर (क्रमांक ३) आणि दापोडी (क्रमांक ६) या उपनिबंधक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात २०२२ मध्ये एकूण २२७ पतसंस्था नोंदणीकृत होत्या. मात्र, मागील अडीच वर्षांत त्यापैकी ३५ संस्थांची नोंदणी रद्द झाल्याने सध्या एकूण १९२ संस्था कार्यरत आहेत, अशी माहिती सहकार विभागाचे उपनिबंधक नवनाथ कंजिरे यांनी दिली आहे.
अनेक पतसंस्था प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार करत नव्हत्या, तर काहींचे पत्तेही शोधून सापडले नाहीत. काही संस्थांनी ठेवी स्वीकारणे आणि कर्जवाटप बंद केले होते, तर काहींमध्ये आर्थिक अनियमितता आढळली होती. परिणामी, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
क्रमांक ३ च्या कार्यक्षेत्रातील पिंपरी-चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, काळेवाडी, थेरगाव, पुनावळे या परिसरातील एकूण ११० पतसंस्था नोंदणीकृत होत्या. त्यापैकी ३५ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर क्रमांक ६ च्या कार्यक्षेत्रातील रावेत, किवळे, दिघी, आकुर्डी, दापोडी, भोसरी, मोशी, चिखली, निगडी, तळवडे परिसरात एकूण ११७ संस्था कार्यरत होत्या आणि त्यापैकी कोणत्याही संस्थेवर कारवाई करण्यात आलेली नाही.
काटेकोर नियम पालन बंधनकारक
नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या व आर्थिक व्यवहार जपलेल्या पतसंस्थांवर कोणतीही कारवाई होणार नाही. मात्र, लेखापरीक्षण वेळेवर करणे, निवडणुका घेणे आणि आर्थिक
व्यवहारांची सविस्तर माहिती सादर करणे हे नियम बंधनकारक असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
संस्थांची नोंदणी रद्द प्रमुख कारणे
- निवडणूक माहिती सादर न करणे
- लेखापरीक्षण न करणे
- ठेवी नसणे
- कर्जवाटप न करणे
- नोंदणीकृत पत्ता उपलब्ध न होणे
- आर्थिक अनियमितता
सहकार कायद्यांच्या नियमांचे पालन न करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांत ३५ नागरी पतसंस्थांवर कारवाई झाली आहे. ज्या संस्थांनी चांगला कारभार केला नाही, त्यांच्यावरही कारवाई झाली आहे. - नवनाथ कंजिरे, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर क्रमांक ३, पिंपरी