पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:40 IST2025-11-08T16:39:20+5:302025-11-08T16:40:12+5:30
- डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा : ९१० कोटी १८ लाखांचा खर्च

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण
पिंपरी : स्वारगेट-पीएमसीएमसी मेट्रोमार्गाचा विस्तार असलेल्या साडेचार किलोमीटरच्या पिंपरी-निगडी मार्गावर सध्या ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक परिसरास पुण्याशी थेट मेट्रो जोडणी मिळेल. यामुळे प्रवासाचा वेळ ३० टक्क्यांनी घटेल. या प्रकल्पाचा खर्च ९१० कोटी १८ लाख रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.
या विस्तारित मार्गाची लांबी ४.५१ किलोमीटर आहे. पीएमसीएमसी ते चिंचवड (१.४६३ किमी), चिंचवड ते आकुर्डी (१.६५१ किमी), आकुर्डी ते निगडी (१.०६२ किमी) आणि निगडी ते भक्ती-शक्ती चौक (०.९७५ किमी) अशा अंतरांमध्ये हा मार्ग विभागला गेला आहे. हा पूर्णपणे इलेव्हेटेड मार्ग असून, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी बांधला जात आहे.
किती स्थानके असणार?
मार्गावर एकूण चार नवीन स्थानके बांधली जात आहेत. यात चिंचवड औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांसाठी सोयीचे ठरणार आहे, खंडोबा माळ चौक (आकुर्डी), टिळक चौक (निगडी) आणि भक्ती-शक्ती चौक मेट्रो स्थानक देहू, चिखली, तळेगाव, वडगावसारख्या उपनगरांसाठी वाहतूक केंद्र बनणार आहे. ही स्थानके पीएमपी बस, रेल्वे आणि ऑटोरिक्षांशी जोडल्यामुळे परिसरातील वाढत्या रहिवासी आणि व्यावसायिक विस्ताराला चालना मिळेल.
परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण
ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या या कामापैकी सध्या ३५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ६५ टक्के काम पुढील १४ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आता काम वेगाने सुरू असून, महामेट्रोने भूमी अधिग्रहण आणि परवानग्यांसाठी महापालिका, एमआयडीसी आणि खासगी मालकांशी चर्चा पूर्ण केली आहे.
किती पिलर उभारले?
मार्गासाठी एकूण सुमारे १५१ पिलर बांधले जाणार आहेत. सध्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पिलर तयार झाले असून, ६० हून अधिक पिलरची पायाभरणी आणि उभारणी पूर्ण झाली आहे. निगडी ते चिंचवड भागात प्राधान्याने काम सुरू असून, पिलर कॅप्स आणि फाउंडेशन वर्कमध्ये ७८ हून अधिक पूर्ण झाले आहेत. हे पिलर भूकंपरोधक तंत्रज्ञानाने बांधले जात आहेत.
सेगमेंट्स किती टाकले?
एकूण १,३३७ सेगमेंट्स बांधले जाणार असून, एप्रिलपर्यंत ५१७ सेगमेंट्स तयार झाले होते. ऑक्टोबरपासून निगडी ते चिंचवड भागात सेगमेंट्सची उभारणी सुरू झाली असून, प्रीकास्ट यार्डमध्ये सतत उत्पादन सुरू आहे. खंडोबा माळ चौक येथे पहिला सेगमेंट लाँचिंग गर्डर बसवण्यात आला आहे.
हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून सध्या ३५ टक्के स्थापत्यविषयक काम झाले आहे. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो