पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेला मान्यतेची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:02 IST2025-10-05T15:00:53+5:302025-10-05T15:02:15+5:30
- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर स्पष्टता येणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेला मान्यतेची प्रतीक्षा
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला अद्याप राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही. साेमवारी (दि. ६) प्रभाग रचनेला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरच प्रभाग रचनेमध्ये बदल केला आहे की नाही, हे स्पष्ट हाेणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे अंतिम प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच हाेणार असून, १२८ नगरसेवक संख्या कायम आहे. त्यानुसार महापालिकेने २२ ऑगस्टला चारसदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध केली.
प्रभाग रचनेवर ३१८ हरकती, सूचना आल्या हाेत्या. त्यावर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी १० सप्टेंबर रोजी एकाच दिवशी सुनावणी घेतली. हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम केली. ही अंतिम रचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाला सादर केली. अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. आयोगाच्या मान्यतेनंतर ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप अंतिम रचनेला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी (दि. ६) मान्यता मिळून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार का? याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या प्रभाग रचनेला अद्याप निवडणूक आयाेगाची मान्यता मिळाली नाही. साेमवारी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आयाेगाची मान्यता मिळताच अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका