पिंपरी - चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:04 IST2021-08-26T16:04:14+5:302021-08-26T16:04:26+5:30
तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली

पिंपरी - चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी
पुणे : न्यायालयाची दिशाभूल करून अंतरिम जामीन मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लांडगे यांनी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आईच्या आईचे (आजीचे) निधन झाले असल्याचे सांगितले होते.
मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांची मावशी गेली आहे. त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली असल्याचा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी हेडाऊ यांनी लाडगेंचा जामीन फेटाळला.
होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदार जाहिरात ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन लांडगे यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
नितीन लांडगे यांनी आईच्या आईचे निधन झाले असल्याचे सांगून तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी लांडगे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी मेडिकल कारणास्तव पुन्हा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याला सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी विरोध केला. फिर्यादीने लांडगे यांचे स्वीय सहाय्यक पिंगळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना ३ टक्क्याऐवजी २ टक्केप्रमाणे पैसे देण्याबाबत चर्चा करण्यात आली. लांडगे यांनी ‘ठीक आहे दो से करो, दोन ने करून टाका ओके’ असा आदेश दिला व त्यानुसार ६ फाईल्स च्या दोन टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार रूपयांची लाच शिपाई कांबळे यांनी स्वीकारली.
लांडगे यांना जामीन मंजूर झाल्यास गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. तपासात उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. तसेच त्यांच्यात आणि अ़टक झालेले ५ आरोपी यांच्यात काही रँकेट आहे का? याबाबत तपास करणे आहे. लांडगे यांच्याविरूद्ध गुन्हयाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे बाकी आहे असा युक्तिवाद अँड घोरपडे यांनी न्यायालयात केला. लांडगे यांच्या वतीने अँड प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी देत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, उद्या (27) लांडगे यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.