आरोप झालेल्या बीट निरीक्षकाला महापालिकेची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:54 IST2025-05-22T15:53:13+5:302025-05-22T15:54:25+5:30
कारवाईच्या वेळेस बंगलेधारक नागरिकांनी शिरसाठ नावाचा बीट निरीक्षक आमच्याकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन जायचा

आरोप झालेल्या बीट निरीक्षकाला महापालिकेची नोटीस
पिंपरी : चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या ३६ अनधिकृत आलिशान बंगल्यांवरील कारवाईच्या वेळी शिरसाठ नावाच्या बीट निरीक्षकाने पैसे घेतल्याचा आरोप बंगलेमालकांकडून करण्यात आला. दरम्यान, आरोप झालेल्या संबंधित बीट निरीक्षकाला नोटीस बजावत खुलासा मागविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी बुधवारी दिली. इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत सुमारे ७ हजार २४५ चौरस मीटर क्षेत्रफळावर हे दोन ते तीन मजली आलिशान अनधिकृत बंगले उभारण्यात आले होते. ही बांधकामे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे महापालिकेने ते बंगले शनिवारी पाडले.
कारवाईच्या वेळेस बंगलेधारक नागरिकांनी शिरसाठ नावाचा बीट निरीक्षक आमच्याकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन जायचा, असा आरोप जाहीरपणे केला आहे. पैसे घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या बांधकामांना अभय दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अखेर, महापालिका प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आहे.
मनोज लोणकर यांनी सांगितले की, संबंधित बीट निरीक्षक संतोष शिरसाठ या कनिष्ठ अभियंता दुसऱ्या प्रकरणात निलंबित असून, त्याची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. अद्याप चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाहीत. त्यामुळे तो कर्मचारी निलंबित आहे. बंगलेधारकांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित शिरसाठ याला नोटीस बजावत त्याच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले, तसेच सर्व चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीही पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिरसाठ यांच्यावर काय कारवाई होते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.