रंगकामाच्या आर्थिक व्यवहारातून आयुष्याचा झाला बेरंग;रिक्षा क्रमांकावरून क्ल्यू मिळाला अन् गुन्हा उघडकीस आला
By नारायण बडगुजर | Updated: May 22, 2025 16:55 IST2025-05-22T16:54:38+5:302025-05-22T16:55:41+5:30
हॅलो इन्स्पेक्टर: पेंटरच्या खून प्रकरणाचा वाकड पोलिसांनी १२ तासांत लावला छडा

रंगकामाच्या आर्थिक व्यवहारातून आयुष्याचा झाला बेरंग;रिक्षा क्रमांकावरून क्ल्यू मिळाला अन् गुन्हा उघडकीस आला
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयातून फोन आला. बेशुद्धावस्थेतील एका रुग्णाला कोणीतरी टाकून गेले असून, त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वाकड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पथकांनी तपास सुरू केला. संबंधित व्यक्ती पेंटर असून, मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका रिक्षाचा क्रमांक मिळाला. त्यावरून शोध घेत संशयितांना ताब्यात घेतले अन् गुन्ह्याची उकल झाली.
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात २६ जानेवारी २०२४ रोजी एका बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला दाखल करण्यात आले. त्याला बेवारसपणे रुग्णालयात सोडून संशयित पळून गेले. डाॅक्टरांनी तपासणी केली असता, संबंधित रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले. याबाबत वाकड पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे, वाकडचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या.
वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर यांनी पाहणी केली असता मृताच्या खिशात आधारकार्ड मिळाले. त्यावरून माहिती घेऊन त्याच्या पत्नीला रुग्णालयात बोलावून त्याची ओळख पटवली. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एका रिक्षातून संबंधित व्यक्तीला रुग्णालयात आणल्याचे दिसून आले. रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षाचालकाची माहिती घेतली. त्याला ताब्यात घेतले.
पीव्हीसी पाइपने मारहाण
खून झालेला व्यक्ती पेंटर होता. त्याने वाल्हेकरवाडी येथील तरुणाकडून पेंटिंगच्या कामासाठी पैसे घेतले होते. ते पैसे परत देत नव्हता. तसेच पेंटिंगचे कामही करत नव्हता. त्यामुळे तरुणाने पेंटरला चारचाकी वाहनातून वाल्हेकरवाडीत नेले. तेथे त्याचे हातपाय काथ्याने व रिबीनने बांधले. तू माझे पैसे दे, नाहीतर तुला मारणार, अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे नाहीत, असे पेंटर म्हणाला. त्यामुळे संशयितांनी पीव्हीसी पाइपने मारहाण केली. यात पेंटर बेशुद्ध पडला. त्यानंतर संशयितांनी पेंटरला रिक्षातून थेरगाव रुग्णालयात सोडून पळून गेले.
सहा संशयितांना १२ तासांत अटक
पेंटरच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाकड पोलिसांच्या तपास पथकाने १२ तासांत सहा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. पेंटर पैसे देत नव्हता, तसेच कामही करत नव्हता. त्यामुळे त्याचे चारचाकी वाहनातून अपहरण करून वाल्हेकरवाडी येथे नेले. पेंटरला चारचाकी वाहनातून घेऊन गेले असल्याचे पेंटरच्या एका मित्राच्या निदर्शनास आले. त्याने पेंटरच्या पत्नीला याबाबत माहिती दिली होती.
एका बेवारस रुग्णाला रुग्णालयात कोणीतरी सोडून गेल्याचा फोन पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर तपास करून रिक्षा क्रमांकावरून संशयितांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, रंगकामाच्या आर्थिक व्यवहारातून मारहाण केल्याने पेंटरचा मृत्यू झाल्याचे समोर आले. - विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक