Pimpri-Chinchwad : अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेगात आलेली कामे आता रखडणार?
By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2026 13:57 IST2026-02-03T13:54:57+5:302026-02-03T13:57:57+5:30
हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीसह पुणे महानगरातील वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त

Pimpri-Chinchwad : अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेगात आलेली कामे आता रखडणार?
पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी, पुणे-नाशिक महामार्ग यासह पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणांना धारेवर धरले होते. उपाययोजना सुचवून त्याबाबत पवार यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र, आता पवार यांच्यासारखी पकड राहणार नसल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सुस्तावतील, असे दिसून येते. याचा परिणाम अनेक प्रकल्पांवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अजित पवार आग्रही होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिकाही घेतली होती. पालकमंत्री म्हणून त्यांनी २६ जुलै २०२५ रोजी हिंजवडी आयटी पार्क तर ८ ऑगस्ट २०२५ रोजी चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची पाहणी केली होती. तसेच या पाहणीनंतर दोन्हीवेळेस पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील प्रशासकीय इमारतीत आढावा बैठका घेतल्या होत्या.
यावेळी पीएमआरडीए, महापालिका, एमआयडीसी, रस्ते महामंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पोलिस अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पवार यांनी धारेवर धरले होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा, अतिक्रमण हटवा, भूसंपादन करा, अशा सूचना करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू असताना निवडणुकांची आचारसंहिता लागली. त्यामुळे निविदा प्रक्रियेसह इतर कामे राहिली आहेत. आचारसंहिता असल्याचे सांगत प्रशासन सुस्तावले आहे. त्यामुळे नवीन पालकमंत्र्यांनी या उपाययोजना आणि कामांबाबत ठोस पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ढिम्म प्रशासनाकडून काम करून घेतले तरच अजित पवार यांचे वाहतूक कोंडीमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
थेट गुन्हे दाखल करण्याची सूचना
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण करा, भूसंपादन करा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या होत्या. रस्ता रुंदीकरण किंवा भूसंपादनात कोणी आडकाठी आणली तर गुन्हे दाखल करा, असेही पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे कोणतीही सबब न देता प्रशासनाला उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले होते. नव्या पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने प्रशासनाकडून काम करून घेणे आवश्यक आहे.
दबाव झुगारला होता...
रस्ते रुंदीकरणात आमच्या लोकांची जमीन जात आहे, असे सांगून स्थानिक आमदारांसह इतर अनेक लोकप्रतिनिधींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी दबाव झुगारून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनाही त्याबाबत सुनावले होते. आता नव्या पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने दबाव झुगारून काम करणे शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहाटेच्या दौऱ्यांमुळे अधिकाऱ्यांची उडाली होती झोप
अजित पवार यांनी पुणे महानगर हद्दीत अनेकदा पहाटेच रस्त्यांची पाहणी केली होती. तसेच उपाययोजना करण्याबाबत सक्त आदेश दिले होते. त्याबाबत सतत पाठपुरावा करून आढावा बैठकांचा धडाका लावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची झोप उडाली होती.