कलासंवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार ? राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यसंकुल रखडले

By विश्वास मोरे | Updated: August 23, 2025 14:01 IST2025-08-23T14:00:29+5:302025-08-23T14:01:06+5:30

- नाट्यसंमेलन किंवा सांस्कृतिक सोहळ्यात केवळ चर्चा : २५ वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच

pimpari-chinchwad who will take the initiative for the promotion of arts? Theatre complexes have stalled due to lack of political will | कलासंवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार ? राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यसंकुल रखडले

कलासंवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार ? राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यसंकुल रखडले

पिंपरी : शहरातील रंगकर्मीचे नाट्य संकुल उभारण्याचे स्वप्न २५ वर्षे अपूर्णच राहिले आहे. याबाबत केवळ नाट्यसंमेलन किंवा सांस्कृतिक सोहळ्यात चर्चा होते. मात्र, कार्यक्रमाचा पडदा पडताच या विषयावरही पडदा पडतो. गेल्या २५ वर्षांतील युती-आघाडीतील सत्ताधारी आणि राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे नाट्य संकुलाला मुहूर्त सापडलेला नाही.


पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक, संगीत असे कलाविषयक उपक्रम अधिक होत आहेत. शहरामध्ये देशाच्या आणि राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यास आहेत. त्या-त्या भागातील लोककलांची संस्कृती जतन व्हावी, यासाठी नाट्य संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण असताना ठराव करण्यात आला होता. मात्र संकुल झालेले नाही. दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालय आहे.

गोव्यामध्ये कला अकादमी निर्माण झाली आहे. याच धर्तीवर विविध कलांचे प्रशिक्षण, विविध लोकरंगभूमी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी यादृष्टीने प्रशिक्षण मिळावे. प्रशिक्षण, सादरीकरण, संशोधन, नवोदित आणि ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची सोय असावी.  

या व्यासपीठावर नाट्यसंकुलाची चर्चा

१९९९ : ७९ वे मराठी नाट्य संमेलन, अध्यक्ष बाळ भालेराव, सांस्कृतिकमंत्री प्रमोद नवलकर :
२००३ : नाट्य परिषद आयोजित पुरस्कार वितरण सोहळा, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सांस्कृतिकमंत्री प्रा रामकृष्ण मोरे.
२०१६ : अखिल भारतीय लोककला संमेलन, राज्यपाल श्रीनिवास पाटील.
२०१४ : शरद पवार अमृतमहोत्सव सोहळा.
जानेवारी २०२४: शंभरावे नाट्यसंमेलन, अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष

अनेक सोहळ्यांत नाट्य संकुलाची मागणी होते. मात्र, पालकमंत्री अजित पवार हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. रंगभूमीवरील आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी शनिवारी पवार शहरात येतील. त्यांच्यापुढे याविषयी मागणी केली जाईल. 

नवोदित कलावंत घडण्यासाठी प्रायोगिक रंगभूमी महत्त्वाची असते. नाट्य संकुलाद्वारे अभ्यासक्रम तयार केले जाऊ शकतात. प्रायोगिक रंगभूमीला बळ देण्यासाठी, सक्षम होण्यासाठी नाट्य संकुल व्हावे.  - प्रभाकर पवार, नाट्यदिग्दर्शक, पैस रंगमंच 

नाट्यकलेचे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी संकुल असावे, त्या माध्यमातून त्यातून प्रायोगिक रंगभूमीवरील कलावंत घडविण्यासाठी मदत व्हावी. शासन, पालिकेच्या सहयोगाने नाट्य संकुल होण्याची गरज आहे. - डॉ. संजीवकुमार पाटील, संस्थापक अथर्व थिएटर्स
 
नाट्यसंकुलासाठी राजकीय पाठबळ अपेक्षित आहे. अनेक व्यासपीठांवरून या संदर्भातील मागणीची चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप नाट्यसंकुल होऊ शकले नाही. ते लवकर व्हावे. - सुहास जोशी, सदस्य, नाट्य परिषद नियमक मंडळ

नाट्यकला संस्कृतीचे कलेचे संवर्धन व्हावे, यादृष्टीने नाट्य परिषदेच्या वतीने गेल्या २९ वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. नाट्यसंकुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, कलावंतांच्या मागणीस यश येत नाही. नाट्य संकुल उभे राहिल्यास कलेचे संवर्धन होईल. - भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, मराठी नाट्य परिषद शाखा

Web Title: pimpari-chinchwad who will take the initiative for the promotion of arts? Theatre complexes have stalled due to lack of political will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.