वाकड-हिंजवडी पूल एकेरी होणार; मुंबई-बंगळुरु महामार्गावरही बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:35 IST2025-09-27T15:35:26+5:302025-09-27T15:35:42+5:30
मुंबई-बंगळुरु महामार्गावरील कात्रज-देहूरोड बायपासच्या हिंजवडी आणि वाकड परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बदलले

वाकड-हिंजवडी पूल एकेरी होणार; मुंबई-बंगळुरु महामार्गावरही बदल
पिंपरी : वाकड-हिंजवडी पूल आता पीक अवर्समध्ये एकेरी मार्ग म्हणून वापरला जाईल. तसेच, हिंजवडी-वाकड रस्त्यावर वेळेनुसार तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या केल्या जातील. मुंबई-बंगळुरु महामार्गावरील कात्रज-देहूरोड बायपासच्या हिंजवडी आणि वाकड परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बदलले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
वाकड आणि हिंजवडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सकाळी वाकड ते हिंजवडी या दिशेने पूल एकेरी असेल. सकाळी वाकड ते हिंजवडीसाठी तीन मार्गिका असतील, तर हिंजवडी ते वाकडसाठी एक मार्गिका ठेवली आहे. संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये, जेव्हा बहुतांश लोक हिंजवडीहून बाहेर पडतात, तेव्हा ही व्यवस्था उलट असेल, अशी माहिती हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक राहुल सोनवणे यांनी दिली.
तसेच वाकड आणि हिंजवडी परिसरातील मुंबई-बंगळुरु महामार्गावरील प्रवेश ठिकाणामध्येही बदल केले आहेत. एका ठिकाणी लोक फक्त प्रवेश करतील किंवा बाहेर पडतील. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत.
येथे बदल करण्यात आले
सकाळी ८ ते दुपारी १२
वाकड-हिंजवडी पूल एकेरी असेल. वाकड ते हिंजवडीसाठी तीन मार्गिका आणि हिंजवडी ते वाकडसाठी एक मार्गिका असेल. सकाळी हिंजवडी ते वाकड जाणाऱ्यांनी उड्डाणपुलाचा वापर न करता डावीकडे वळून सयाजी अंडरपासमधून यू-टर्न घेऊन गंतव्यस्थान गाठावे.
संध्याकाळी ४ ते रात्री १०
हिंजवडी ते वाकड या दिशेने एकेरी असेल. हिंजवडी ते वाकडसाठी तीन मार्गिका आणि वाकड ते हिंजवडीसाठी एक मार्गिका असेल. संध्याकाळी वाकड ते हिंजवडी जाणाऱ्यांनी उड्डाणपुलाआधी डावीकडे वळून सूर्या अंडरपासमधून यू-टर्न घेऊन गंतव्यस्थान गाठावे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बदल
पंक्चर ठिकाणे बदलण्यात आली असून, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग यात बदल करण्यात आले आहेत. भुजबळ चौकात दोन्ही बाजूंना तात्पुरती बॅरिकेडिंग केले आहे, ज्यामुळे लोक फक्त चौकातून महामार्गावर प्रवेश करू शकतील, बाहेर पडू शकणार नाहीत. सूचना फलक लावले आहेत. मुंबईहून येणारी वाहने सयाजी भुयारीमार्गाआधी महामार्ग सोडतील, तर पुण्याहून येणारी वाहने सूर्या अंडरपासआधी महामार्ग सोडतील.
हे सर्व प्रायोगिक तत्त्वावर असून, या बदलाचा वाहतूक समस्येवर काय परिणाम होतोय याचे निरीक्षण करून हे नियोजन कायम ठेवले जाईल. -विवेक पाटील,पोलिस उपायुक्त,वाहतूक विभाग