उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नको..!आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:16 IST2026-03-28T17:13:45+5:302026-03-28T17:16:22+5:30
- मावळ तालुक्यातील लोणावळा, कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयांची पाहणी

उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नको..!आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक झाली. त्यांनी कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. लोणावळा रुग्णालयातील उर्वरित काम तातडीने संपवून ते तातडीने सुरू करावे, अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या.
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात मंत्री आबिटकर यांनी आरोग्यसेवांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते. औषधसाठा, कर्मचारी संख्या, सोनोग्राफी यंत्रणा, आदी विषयांवर चर्चा झाली. सुविधा, वैद्यकीय यंत्रणा, औषधसाठा यांची माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली.
रिक्त पदे, औषध पुरवठ्यावर चर्चा
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषधांचा पुरवठा, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य विभागाच्या प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आमदार शेळके यांनी लक्ष वेधले. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लोणावळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उर्वरित काम तातडीने संपवून अल्पावधीत रुग्णालय सुरू करण्याची सूचना केली.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात. रुग्णाभिमुख सेवा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता, औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणांच्या कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे.