देहूगाव : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला व चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने स्वत: बैलजोडींची खरेदी करणार असल्याचे रविवारी (ता. १८) प्रसिध्दी द्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रीया व रथाला बैलजोडी जुंपण्याचा मिळणारा मान ही प्रचलित प्रथा यंदा प्रथमच बदलली जाणार आहे. मात्र या मुळे भाविक शेतकरी व बैलजोडी मालक दुखावले जाणार आहेत.बुधवार दि. १८ जुन रोजी श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे श्री क्षेत्र देहूगाव येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. यातील एक भाग बैलजोडी निवड करणे व संबधीत बैलजोडीला श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान देणे हा होता. यंदा संस्थानच्या नवनिर्वाचित पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त मंडळाने प्रथमच संस्थानच्या वतीने बैलजोडी खरेदी करून त्यांनाच रथाला जुंपण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
हा आश्चर्यकारक व ऐतिहासिक बदल असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील परिसरातील श्री संत तुकाराम महाराजांवर श्रध्दा ठेवणारे शेतकरी व भाविक नाराज होणार आहेत. पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने भाग्याचे होते. मात्र ती संधी यंदा मिळणार नाही. या बाबत श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख यांच्या सहीन प्रसिध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे यंदा पालखीरथासाठी बैलजोडी निवड प्रक्रीया होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.