Pimpari-chinchwad : शहरात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीतच पारा ३५ अंशाजवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:45 IST2026-02-25T13:44:01+5:302026-02-25T13:45:23+5:30
गेल्या आठवड्यापर्यंत शहरवासीयांना पहाटे थोडी थंडी जाणवत होती. मात्र, २१ फेब्रुवारीपासून तापमान अचानक वाढले

Pimpari-chinchwad : शहरात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीतच पारा ३५ अंशाजवळ
पिंपरी : फेब्रुवारी महिना संपत असतानाच शहरातील उन्हाचा कडकपणा वेगाने वाढत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आतापासूनच मे महिन्याच्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. रात्रीचे तापमानही १८ अंशावर राहिल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत शहरवासीयांना पहाटे थोडी थंडी जाणवत होती. मात्र, २१ फेब्रुवारीपासून तापमान अचानक वाढले आहे. २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी शहराच्या काही भागात तापमान ३५ अंशांच्या जवळ गेल्याची नोंद झाली. मंगळवारी (दि.२४) देखील दुपारच्या सुमारास तापमान ३२ ते ३३ अंशांच्या आसपास होते. वातावरणातील आर्द्रता कमी होऊन हवा कोरडी झाल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. अधूनमधून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.
दिनांक - कमाल तापमान - किमान तापमान (अंशामध्ये)
२० फेब्रुवारी - ३३ - १८
२१ फेब्रुवारी - ३४ - २०
२२ फेब्रुवारी - ३५ - २१
२३ फेब्रुवारी - ३३ - १९
२४ फेब्रुवारी - ३२ - १८
आरोग्यावर परिणाम
तापमानात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, खोकला आणि थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले असून रसवंतीगृहे आणि शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. येत्या काही दिवसांत कमाल तापमानात आणखी १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. भरपूर पाणी प्या आणि लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करा. सुती आणि हलके कपडे परिधान करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.