आज तुकाराम बीज; देहूच्या इंद्रायणी तीरावर फुलला वैष्णवांचा मळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:11 IST2026-03-05T14:11:44+5:302026-03-05T14:11:59+5:30

- राज्यभरातून दिंड्यांसह वारकरी दाखल, भजन-कीर्तनाने दुमदुमली नगरी

pimpari-chinchwad the garden of Vaishnavites blossomed on the banks of the Indrayani River in Dehu | आज तुकाराम बीज; देहूच्या इंद्रायणी तीरावर फुलला वैष्णवांचा मळा

आज तुकाराम बीज; देहूच्या इंद्रायणी तीरावर फुलला वैष्णवांचा मळा

पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन दिनानिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे आज (गुरुवार) संत तुकाराम महाराज बीज सोहळा होत आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे इंद्रायणीकाठ भक्तिमय झाला आहे. हरिपाठ, भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने अवघी देहुनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.

बीज सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर परिसरात पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, हरिनाम संकीर्तन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात वारकरी, भाविकांनी मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर परिसरात दर्शनासाठी बुधवारी (दि.४) रांगा लावल्या होत्या.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी इंद्रायणी नदीकाठ परिसरात राहुट्या उभारल्या आहेत. भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम संकीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. बीज सोहळ्याच्या पूर्वसंध्येला वारकरी भक्तिभावात तल्लीन झाले होते.

देहू नगरपंचायतीने स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रकाश व्यवस्था केली आहे. प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. महावितरणकडून अखंड वीजपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथक २४ तास कार्यरत आहे. महसूल विभागासह पोलिस, आरोग्य व अन्य विभागांनीही आवश्यक नियोजन केले आहे.  भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बीजेनिमित्त आजचे धार्मिक कार्यक्रम

पहाटे तीन : काकडा आरती,

पहाटे चार : संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते श्रींची महापूजा व शिळा मंदिरात महापूजा.

पहाटे सहा : संस्थानचे विश्वस्त गणेश महाराज मोरे व उमेश महाराज मोरे यांच्याहस्ते वैकुंठस्थान येथे संत तुकाराम महाराज पूजा.

सकाळी १० : वैकुंठस्थान मंदिर येथे देहूकर महाराज मोरे यांचे वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन.

सकाळी १०:३० : मुख्य मंदिरातून श्रींच्या पालखीचे वैकुंठगमन स्थान गोपाळपुराकडे प्रस्थान.

दुपारी १२ : हरिनामाच्या गजरात नांदुरकीच्या वृक्षावर तुळशी आणि फुलांचा वर्षाव.

दुपारी १२:३० : श्रींची पालखी पुन्हा मुख्य मंदिरात परतणार.

Web Title : तुकाराम बीज: देहू में इंद्रायणी नदी भक्तों से भरी

Web Summary : देहू में तुकाराम बीज धूमधाम से मनाया जा रहा है। हजारों भक्त इंद्रायणी नदी के किनारे जमा हुए। प्रार्थना, जुलूस और अनुष्ठान इस शुभ दिन को चिह्नित करते हैं। शहर सुरक्षित है और तीर्थयात्रियों के लिए सुविधाएं प्रदान की गई हैं।

Web Title : Tukaram Beej: Dehu's Indrayani Riverbank Overflowing with Devotees

Web Summary : Dehu celebrates Tukaram Beej with fervor. Thousands gather, filling Indrayani's banks with devotion. Prayers, processions, and rituals mark the auspicious day. The city is secured, and facilities are provided for the pilgrims.