पितृ पंधरवडा संपला आणि दस्त नोंदी करण्यासाठी सकाळपासून वाढली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:39 IST2025-09-26T12:39:47+5:302025-09-26T12:39:56+5:30
- शहरातील पाचही दुय्यम निबंधक कार्यालयांतील चित्र : 'स्लॉट' मिळवण्यासाठी खरेदीदारांची धावपळ; दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी घर-जमिनींच्या खरेदी-विक्रीला आला वेग

पितृ पंधरवडा संपला आणि दस्त नोंदी करण्यासाठी सकाळपासून वाढली गर्दी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, पिंपरी, दापोडी, भोसरी आणि चिंचवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये पितृ पंधरवड्यानंतर दस्त नोंदीसाठी गर्दी दिसून आली. पितृ पंधरवड्यामुळे आणि त्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे दस्त नोंदीची कामे ठप्प होती. मंगळवारी (दि.२३) कार्यालये सुरू होताच नागरिकांनी दस्त नोंदीसाठी मोठ्या प्रमाणात धाव घेतली. परिणामी, कार्यालयांमध्ये सकाळपासूनच झुंबड उडाली.
पितृ पंधरवड्यात नवीन खरेदी-विक्री व्यवहार टाळले जातात. घर, जागा अथवा फ्लॅट खरेदीसाठी मुहूर्त पितृ पंधरवड्यानंतरच पाहिला जातो. त्यामुळे पंधरा दिवसांच्या कालावधीत दस्त नोंदीच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. त्यानंतर सलग सुट्टया असल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. कार्यालय सुरू होताच नागरिकांनी दस्त नोंदीसाठी कार्यालय गाठले. कार्यालयातील स्लॉट मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून सकाळपासूनच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिक रांगा लावू लागले आहेत.
कर्मचाऱ्यांवरही वाढला कामाचा ताण
दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसून आल्या. 'स्लॉट' मिळवण्यासाठी खरेदीदारांची धावपळ सुरू होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला होता. ऑनलाइन प्रणालीचा वापर करून प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून कर्मचारी व्यस्त दिसले.
दस्त नोंदणीची संख्या वाढण्याचा अंदाज
दसरा आणि दिवाळीचा काळ खरेदीसाठी चांगला मुहूर्त मानला जातो. त्यामुळे मुहूर्त पाहून व्यवहार करण्याची परंपरा असल्याने दस्त नोंदींची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुढील आठवड्यातही अशीच गर्दी राहणार
दसरा आणि दिवाळीपूर्वी घर-जमिनींच्या खरेदी-विक्रीला वेग येणार असल्याने आगामी आठवडाभर या कार्यालयांमध्ये अशीच गर्दी राहणार असल्याचे निगडीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. जीएसटी कपातीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिक अधिक गर्दी करत आहेत.