pimpari-chinchwad : ‘स्थायी’साठी अपक्ष नगरसेवकाची साथ भाजपला लाभदायी
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 18, 2026 11:58 IST2026-02-18T11:55:47+5:302026-02-18T11:58:04+5:30
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे ११ सदस्य निश्चित : राष्ट्रवादीचे संख्याबळ चारवर

pimpari-chinchwad : ‘स्थायी’साठी अपक्ष नगरसेवकाची साथ भाजपला लाभदायी
पिंपरी : महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता मिळाली. भाजपचे ८४, तर भाजप पुरस्कृत एक अपक्ष निवडून आले आहेत. या अपक्षाची साथ भाजपला स्थायी समितीत लाभदायी ठरणार आहे. अपक्ष सोबत आल्यामुळे स्थायी समितीत भाजपकडून १० ऐवजी ११ नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्ती करता येणार आहे. यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा पाचऐवजी चार सदस्य स्थायी समितीवर जाणार आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये त्या-त्या पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळते. भाजपचे एकूण ८४ नगरसेवक, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ३७, शिंदेसेनेचे ६ आणि १ भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक आहेत. नगरसेवकांच्या संख्येप्रमाणे पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीवर भाजपाच्या १० नगरसेवकांना नामनिर्देशित करता येत होते. राष्ट्रवादीला पाच आणि शिंदेसेनेच्या एकाला सदस्य करता नियुक्त करता आले असते. सुरुवातीला फक्त ८४ नगरसेवकांचा गट भाजपकडून नोंदविला होता. परंतु, नंतर ८४ आणि १ अपक्ष असा एकत्रित आघाडीची नोंद भाजपकडून केली आहे. भाजपसोबत अपक्ष आल्यामुळे ही संख्या ८५ झाली आहे. संख्याबळ वाढल्याने भाजपच्या ११ नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. या समीकरणामुळे अपक्षाच्या साथीमुळे पाच वर्षे भाजपला स्थायी समितीत एक सदस्य जास्तीचा देता येणार आहे. राष्ट्रवादीला चार सदस्यांवर समाधान मानावे लागणार आहे. शिंदेसेनेचा एकच नगरसेवक समितीमध्ये असणार आहे.
अधिनियमातील तरतूद काय ?
अपक्षासह ८५ नगरसेवकांचा गट नोंद केल्यानंतर भाजपच्या अकराव्या व राष्ट्रवादीच्या पाचव्या अर्थात दोन्हींसाठी अतिरिक्त एका जागेसाठी दोन्ही पक्षाची स्थिती समसमान आहे. मात्र, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अकरावा सदस्य भाजपला देता येणार, हे निश्चित आहे. कारण, स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या संख्येबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याबाबत महापालिकेचा निर्णय अंतिम राहील, अशी तरतूद आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे अकरावा सदस्य देण्यास भाजपला कोणताही अडथळा येणार नाही.
इतर समित्यांमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे तीन सदस्य
विधी, शिक्षण, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या पाच विषय समित्या आहेत. नऊ सदस्यांच्या समितीत भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. कमी संख्याबळामुळे विषय समित्यांमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेवकांना संधी मिळणार नाही.