पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:03 IST2025-07-23T21:01:34+5:302025-07-23T21:03:40+5:30
पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ते भारतीय असल्याचे सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातून सहा बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लोहगाव विमानतळावर सहा जणांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) ताब्यात दिले. बीएसएफकडून विशेष विमानाने २२ जुलै रोजी बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले.
मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख (वय ३४), अब्दुला शागर मुल्ला (२५), मोबिन हारून शेख (३९), जहांगीर बिलाल मुल्ला (३५), मोहम्मद इलाहीन इलियास बिश्वास (२२), तोहीद मुस्लेम हसन शेख (२६) अशी डिपोर्ट केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
सहा बांगलादेशी नागरिक वाकड येथील भुजबळ चौकातून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ते भारतीय असल्याचे सांगितले. त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे आढळून आले. त्यांना २२ जुलै रोजी त्यांच्या मायदेशी रवाना करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्थापन झाले. तेव्हापासून शहरातून प्रथमच अशा प्रकारे डिपोर्टींगची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सहा बांगलादेशी नागरिकांना पुणे विमानतळावरून गुवाहाटी येथे नेण्यात आले. तिथून पुढे बीएसएफच्या नियोजनानुसार त्यांना बांग्लादेशात पाठवण्यात आले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नितीन लांडगे, पोलिस निरीक्षक विकास राऊत, सहायक निरीक्षक राजश्री पावरा, उपनिरीथक भरत माने, मयुरेश साळुंखे, सहायक उपनिरीथक संजय गवारे, पोलिस अंमलदार प्रवीण दळे, तुषार शेटे, कृणाल शिंदे, सुरेश जायभाये, भाऊसाहेब राठोड, शिवराम भोपे, मोहम्मद गौस नदाफ, नितीन ढोरजे, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, अभिषेक मांडे, शबाना सय्यद, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
थेट हद्दपारीची कारवाई
विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलाेदशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले जात होते. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर या घुसखोरांवर वाॅच ठेवावा लागत होता. त्यामुळे पोलिसांसह इतर यंत्रणांवरही ताण येत होता. त्यामुळे अशा परदेशी नागरिकांवर थेट हद्दपारीची कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करून त्यांच्या देशात पाठविले आहे.