मीटरने भाडे घेण्यास रिक्षाचालकांचा नकार;उद्योगनगरीतील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:35 IST2025-07-06T15:34:18+5:302025-07-06T15:35:03+5:30
- कमी अंतरासाठी मीटरपेक्षा दुप्पट दराची मागणी; क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक नित्याचीच

मीटरने भाडे घेण्यास रिक्षाचालकांचा नकार;उद्योगनगरीतील चित्र
- आकाश झगडे
पिंपरी : उद्योगनगरीमध्ये रिक्षांमधील मीटर केवळ दाखवण्यापुरते राहिले आहेत. मीटरने रिक्षा भाडे घेण्यास रिक्षाचालक सर्रास नकार देत आहेत. याशिवाय निर्धारित संख्येपेक्षा जास्त प्रवासी वाहतूकही शहरात मोठ्या प्रमाणावर होत आहे. नियमबाह्य प्रवासी वाहतुकीमुळे अपघातांची भीती आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत हे वास्तव दिसून आले.
कमी अंतरावरील प्रवासासाठी मीटरपेक्षा दुप्पट दराची मागणी चालकांकडून केली जात आहे. यावर विचारणा केली तर चालक प्रवासी घेण्यास थेट नकार देतात. रात्री नऊनंतर अशा प्रकारांमध्ये वाढ होते. चालकांच्या अशा मनमानीमुळे प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. रिक्षाचालक सांगतील ते भाडे द्यावे लागत आहे. मीटरनुसार भाडे घेतले जात नसल्याने चालक व प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात.
अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या समोरून रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाताना दिसतात. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही.
शेअरिंग वाहतुकीवर भर
मीटरनुसार भाडे आकारून वाहतूक करण्यापेक्षा शेअरिंग तत्त्वावर प्रवासी वाहतूक करण्यावर रिक्षाचालकांचा भर आहे. असा प्रवास प्रवाशांनाही परवडत असल्याने तेही प्राधान्य देतात. यातूनच अधिक भाडे मिळण्याच्या हेतूने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवले जातात.
नियंत्रणाची जबाबदारी कोणाची?
रिक्षाचालकांच्या या मनमानीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि स्थानिक वाहतूक पोलिसांची आहे. २०२१ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ‘मीटर डाउन’ या उपक्रमाची सुरुवात करून मीटरप्रमाणे दरआकारणी सक्तीची केली होती. नियमांचे उल्लंघन झालेल्या तक्रारीवर त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मात्र कालांतराने या उपक्रमाचा बोजवारा उडाला.
सध्याचे मीटरप्रमाणे दर
पहिल्या १.५ किलोमीटरसाठी : २५ रुपये
त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी : १७ रुपये
रात्रीच्या वेळी (मध्यरात्री १२ ते पहाटे पाचपर्यंत) मूळ भाड्याच्या २५ टक्के अतिरिक्त शुल्क.
६० बाय ४० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराच्या प्रत्येक बॅगसाठी सहा रुपये अतिरिक्त शुल्क. (ब्रीफकेस, अटॅची केस, लहान बॅग किंवा हँडबॅग वगळता)
शहरातील प्रवासी वाहतुकीच्या रिक्षांबाबत कोणत्याही गैरप्रकारांना रिक्षा पंचायत संघटनेचे समर्थन नाही. कोणताही रिक्षाचालक नियमबाह्य वर्तन करत असल्यास त्यावर संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्यात यावी. - बाबा कांबळे, अध्यक्ष, रिक्षा पंचायत, महाराष्ट्र राज्य
शहरात अलीकडच्या काळात बहुतेक रिक्षाचालक मीटरने भाडे घेण्यास नकार देत आहेत. यामुळे आमच्यासारख्या सामान्य प्रवाशांना त्रास होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अशा गैरप्रकरांवर वेळीच नियंत्रण आणावे. - गुलाब बिरदवडे, रिक्षा प्रवासी
सर्व रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे घेणे अपेक्षित आहे. अशी तक्रार कार्यालयाकडे आल्यास तत्काळ त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर नियमित कारवाई होत असते. तरीही अशी वाहतूक कोठे आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी. योग्य कारवाई केली जाईल. - विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग