Pimpari-chinchwad : बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:51 IST2025-10-09T12:49:56+5:302025-10-09T12:51:15+5:30
वाकड येथील टीडीआर प्रकरण आणि कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा त्रास झाल्याची कबुली

Pimpari-chinchwad : बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही याची खंत
पिंपरी : बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही, याची खंत आहे. त्यासाठी लागणारी रक्कम मोठी होती. त्यात राज्य शासनाने मदत करणे आवश्यक होते. जलवाहिनीचे काम लवकर झाले असते तर शहराला एक दिवसाआड ऐवजी दररोज पाणीपुरवठा झाला असता, अशी कबुली महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. शेखर सिंह यांची मंगळवारी (दि. ७) बदली झाली. त्यानंतर बुधवारी (दि. ८) त्यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला.
सिंह म्हणाले की, वाकड येथे विकसकाला कामाच्या बदल्यात देण्यात आलेला टीडीआर आणि कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईचा त्रास झाला. मात्र, या दोन्ही गोष्टी प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि महापालिकेच्या विकासाच्या दृष्टीचे महत्त्वाच्या होत्या. मुळशी व ठोकळवाडी धरणाचेही पाणी लवकरात लवकर आणण्याचे प्रयोजन होते. ते होऊ शकले नाही.
शहराच्या दृष्टीने ‘अर्बन स्ट्रीट’ योग्यच
शेखर सिंह म्हणाले की, शहरात वाहतूक कोंडीवर उपाय व्हावा, यासाठी अर्बन स्ट्रीट प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रयोग आज जरी नागरिकांना योग्य वाटत नसला, तरी भविष्यातील वाहतूक कोंडीवर तोच शाश्वत उपाय आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे, तरच त्याचा फायदा होईल. शहरातील बीआरटी व्यवस्थाही सक्षम झाली पाहिजे.
महापालिका देशात वेगळ्या उंचीवर
सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका देशात वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. मोशी येथील कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाने देशभरात महापालिकेला उंचीवर नेऊन ठेवले. विविध पुरस्कारांनीही महापालिकेला गौरविण्यात आले.
पालकमंत्र्यांची नाराजी नाही
पालकमंत्री अजित पवार यांना प्रभाग रचनेमध्ये धक्का बसल्याने त्यांनी तुमच्या बदलीसाठी प्रयत्न केले आहेत का, असे विचारले असता सिंह म्हणाले की, पालकमंत्री पवार यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. साताऱ्यापासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. शहरात काय करायचे आणि काय नाही, याबाबत त्यांची भूमिका खूप स्पष्ट असते. त्यांना पिंपरी-चिंचवडचा प्रत्येक भाग माहिती असून शहरातील प्रत्येकाशी चांगला संपर्क आहे. त्यांची नाराजी नसून, माझा कार्यकाल संपल्यामुळे बदली झाली आहे.