कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल...
By श्रीनिवास नागे | Updated: October 1, 2025 11:56 IST2025-10-01T11:55:36+5:302025-10-01T11:56:08+5:30
राज्यात दादांच्या घड्याळाचा सर्वाधिक गजर पिंपरी-चिंचवड महापालिकेत होऊ शकतो, अशी अटकळ त्यात बांधलीय म्हणे! झालं... चक्र फिरू लागली.

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल...
- श्रीनिवास नागे
मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडत होता. त्यादरम्यान अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी ‘स्मार्ट’ बनत होती. सगळा पक्ष गुलाबी रंगात न्हाऊन निघत होता. गुलाबी जॅकेटमधल्या दादांची ‘एंट्री’ तर झोकात होत होती. पक्षाच्या वाटचालीसाठी नेमलेल्या कंपनीचा सल्लाच तसा होता. बक्कळ म्हणता येतील, एवढ्या ४१ जागा मिळाल्या. दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. आता त्याच कंपनीनं नवा सर्व्हे दिलाय म्हणे. राज्यात दादांच्या घड्याळाचा सर्वाधिक गजर पिंपरी-चिंचवड महापालिकेत होऊ शकतो, अशी अटकळ त्यात बांधलीय म्हणे! झालं... चक्र फिरू लागली. पायाला भिंगरी बांधलेल्या दादांची पायधूळ या उद्योगनगरीत पुन:पुन्हा झडू लागली.
पिंपरी-चिंचवड शहरात अजितदादांची थेट ‘एंट्री’ झाली १९९१ मध्ये. खासदार म्हणून. तेव्हा, शहरावर काँग्रेसच्याच प्रा. रामकृष्ण मोरेंचा वरचष्मा होता. त्यामुळे पक्षात दोन-दोन सत्ताकेंद्र तयार झाली. दादांनी मोरेंना बाजूला करून महापालिका स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी पद्धतशीर पावले टाकली. त्याचा पहिला प्रत्यय आला १९९३ मधल्या महापौर निवडीवेळी. दादांच्या पाठबळावर विलास लांडे अवघ्या तीन मतांनी महापौर झाले. अर्थात बारामतीच्या काकांच्या अदृश्य हाताची रसद होतीच, तेव्हापासून दादांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यास सुरुवात केली. ताकदीचे मोहरे आपल्याकडे ओढले. कामांचा फडशा पाडणं, दांडगा जनसंपर्क आणि वैयक्तिक ओळखी ही दादांची बलस्थानं. पुढं १९९९ मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर २००२ मध्ये महापालिकेत थेट काँग्रेसशी सामना. राष्ट्रवादीनं १०५ पैकी ३६, तर काँग्रसनं मोरेंच्या नेतृत्वाखाली ३२ जागा जिंकल्या. सत्तेसाठी नाईलाजानं दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या.
२००३ मध्ये रामकृष्ण मोरेंचं निधन झालं. मग तिकडची तगडी मंडळी दादांकडं आली. नंतर २००७ आणि २०१२ मधल्या महापालिका निवडणुकांत दादांनी विरोधकांना नेस्तनाबूत केलं. दणदणीत बहुमतामुळं दादा म्हणतील तीच पूर्वदिशा असं चित्र तयार झालं. एकहाती कारभार. पुढं त्यांच्याच शिलेदारांनी ‘घड्याळ’ काढून टाकून हाती ‘कमळ’ घेतलं आणि २०१७ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावं लागण्याची वेळ आली.
दादांकडून भाजपकडं गेलेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघा आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर दादांच्या गटाला जेरीस आणलं. उद्योगनगरीतले प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, बडे प्रकल्प, बारा किलोमीटरचा दापोडी-निगडी हमरस्ता दादांच्याच सत्ताकाळात झालेले. ते सगळं मागं पडलं....
पण आता त्याच कामांचा इतिहास आणि वर्तमानातला सर्व्हे दादांना सत्तेची ‘झूल’ चढवण्याची ‘भूल’ देऊ लागलाय. महापालिका निवडणका महायुतीतून भाजप-शिवसेनेसोबत लढवण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याची ‘हूल’ त्यातूनच उठवून दिली गेली असावी बहुधा. सत्तेतून बाहेर फेकल्याच्या रागाचा अंमल अजून आहे. भरीस भर म्हणजे, राष्ट्रवादी फुटल्यानंतर ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवरवाले शिलेदार दादांकडेच राहिले. काही ‘तुतारी’ फुंकून परत आले. त्या सगळ्यांनी आता दादांना आपापलं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ दाखवण्याचा आटापिटा सुरू केलाय.
पण दादाही हुश्शार..! ते स्वत: प्रत्येकाचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ जोखून घेऊ लागलेत. ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’ हे मेरिट मोजण्याचं पहिलं माप. नंतर २०१७ पासूनचा सगळ्यांच्या कामाचाही ‘सातबारा’ मोजला जाणार. मग बाकीच्या पक्षांची ताकद अजमावणार. हे सगळं मोजूनमापून झालं की ठरणार, सत्तेची ‘झूल’ चढवण्यासाठी महायुतीची गाडी जुंपायची की आपापली स्वतंत्र पळवायची..!