हिंजवडीत रस्त्यांवर खड्डे, चिखल, अतिक्रमणांचा राडारोडा;मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:26 IST2025-09-16T16:25:48+5:302025-09-16T16:26:17+5:30
- मेट्रोच्या अर्धवट कामांचा फटका, आयटीयन्स, नोकरदारांसह स्थानिक नागरिक त्रस्त, कामे उरकणार कधी?

हिंजवडीत रस्त्यांवर खड्डे, चिखल, अतिक्रमणांचा राडारोडा;मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे वाभाडे
पिंपरी : पावसाने हिंजवडी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज-३ कडून भूमकर चौक व भुजबळ चौकाकडे येताना रस्ते खड्डेमय झाले आहेत. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाचे पाणीही रस्त्यांवर साचत आहे. त्यात रस्त्यांवर पसरलेल्या चिखलामुळे नागरिकांचे हाल होतात. अतिक्रमणांचा राडाही तसाच असल्याने पावसाळ्यातील हीच परिस्थिती दरवर्षी पुनरावृत्ती होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
हिंजवडी ही पुण्यातील प्रमुख आयटी हब आहे. रोज हजारो वाहने या परिसरात ये-जा करतात. मेट्रो स्टेशनखाली आणि हिंजवडी फेज १ ते फेज ३ जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांना धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने जोरात आदळत आहेत.
फेज-३ मध्ये रस्त्यावर चिखल
फेज-३ येथील मेगापोलिस सॅफ्रॉन चौकजवळील मेट्रो स्थानक परिसरात रस्त्यावर चिखल पसरला आहे. तसेच मेट्रोच्या कामातील रेतीही ठिकठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
पावसाचे पाणी रस्त्यावर
पावसाचे पाणी वाहून नेणारी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून राहत आहे. फेज-३ कडून फेज-१ कडे येताना रस्त्यावरच पाणी वाहत आहे. त्यातूनच नागरिकांना मार्ग काढून जावे लागते.
येथे धोकादायक खड्डे
भुजबळ चौकातून शिवाजी चौकाकडे जाताना आणि शिवाजी चौकातून भूमकर चौकाकडे जाताना मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच फेज-१ कडून फेज-२ कडे येताना अर्धा ते एक फूट खोल खड्डे तयार झाले असून, त्यांची रुंदीही मोठी आहे. त्याच रस्त्याने पुढे फेज-३ कडे जाताना माण पीएमपी डेपोजवळ आणि एका मॉलच्या समोरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत.
फेज-३ येथील मेट्रो स्थानक परिसरात उतार असल्याने पावसाचे पाणी साचते. तसेच रस्त्यावर खड्डे पडले असून, प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. - प्रवीण घोंगडे, आयटीयन्स
प्रशासन खड्डे दुरुस्त करते. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे पडतात. मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे जात असून, प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित पदपथ तयार करणे गरजेचे आहे. - पवनजीत माने, आयटीयन्स
पद्मभूषण चौकातून फेज-२ कडे जाताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामधून कडेकडेने जावे लागते. अनेकदा मोठी वाहने अंगावर पाणी उडवतात. - नंदकुमार सेवान, पादचारी
मेट्रोच्या कामासाठी एमआयडीसीने पीएमआरडीएला रस्ता हस्तांतरण केला, त्यामुळे एमआयडीसी रस्त्याची देखभाल करण्यास तयार नाही आणि पीएमआरडीए व्यवस्थित रस्ते दुरुस्त करत नाही. पिंपरी- चिंचवड महापालिका पावसाळ्यात खड्डे बुजवते, तसे हिंजवडीतील खड्डे बुजवणे गरजेचे आहे. या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. - प्रदीप आवटी, आयटीयन्स