पोलिस चालक भरती चाचणी दुपारच्या सत्रात होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:48 IST2026-03-10T16:47:25+5:302026-03-10T16:48:15+5:30
- पोलिस शिपाईचालक भरतीसाठी चाचण्या होणार असल्याने हे बदल घडले आहेत.

पोलिस चालक भरती चाचणी दुपारच्या सत्रात होणार
पिंपरी :पुणे ग्रामीण पोलिस भरतीप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर वाहनचालक चाचणीचे वेळापत्रक बदलले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी- चिंचवड येथे मंगळवारी (दि. १० मार्च) आणि बुधवारी (दि. ११) अपॉइंटमेंट घेतलेल्या उमेदवारांना सकाळी ७ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी पोलिस शिपाईचालक भरतीसाठी चाचण्या होणार असल्याने हे बदल घडले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुणे ग्रामीणच्या मोटार वाहन निरीक्षक विभागाच्या विनंतीवरून हे बदल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त पोलिस शिपाई चालक पदासाठी अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दि. १० आणि ११ मार्च रोजी दुपारच्या सत्रात नाशिक फाटा येथील आयडीटीआर येथे होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आरटीओ पिंपरी-चिंचवडमार्फत पक्क्या अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणाऱ्या आणि दि. १०-११ मार्चची अपॉइंटमेंट घेतलेल्या सर्व उमेदवारांची चाचणी सकाळच्या सत्रात सकाळी ७ वाजता सुरू होईल. उमेदवारांनी त्यांना दिलेल्या नेमकी वेळेच्या आधीच उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.