मुक्या प्राण्यांचा अनन्वित छळ;पाच वर्षांत १५२ गुन्हे दाखल; श्वानप्रेमींकडून चिंता व्यक्त
By नारायण बडगुजर | Updated: August 16, 2025 18:14 IST2025-08-16T18:14:34+5:302025-08-16T18:14:57+5:30
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत भटक्या श्वानांवरील हल्ल्यांचे प्रकार सर्वाधिक : प्राण्यांना यातना; श्वानप्रेमींकडून चिंता व्यक्त; श्वानांची नसबंदी आणि दत्तक घेण्याबाबत जनजागृती नसल्याचा परिणाम

मुक्या प्राण्यांचा अनन्वित छळ;पाच वर्षांत १५२ गुन्हे दाखल; श्वानप्रेमींकडून चिंता व्यक्त
पिंपरी : माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र, काही जण अमानुष कृत्य करत या प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देतात. त्यामुळे प्राण्यांना यातना सहन कराव्या लागतात. काही प्राण्यांना जीवाला मुकावे लागते. याप्रकरणी पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दिल्ली येथे भटक्या श्वानांसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. त्यानंतर देशभरातील महानगरांमधील श्वानांसाठीही तशाच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातही काही जणांकडून या मागण्या मांडण्यात येत आहेत. याबाबत श्वानप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. भटक्या श्वानांना मारहाण केली जाते, त्यांच्या अंगावरून वाहने नेली जातात तसेच त्यांची हत्यादेखील केली जाते. याबाबत श्वान प्रेमींनी वेळोवेळी तक्रार केल्याने पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले.
महापालिका, राज्य शासनाचे दुर्लक्ष
भटक्या श्वानांचा उपद्रव कमी होण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाने वेळोवेळी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कोट्यवधींची तरतूद करून त्याचे ठेके महापालिकेकडून दिले जातात. त्यानंतरही श्वानांची नसबंदी केली जात नाही. तसेच श्वान दत्तक घेण्याबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे शहरात श्वानांची संख्या वाढत आहे.
चुकीची आकडेवारी
घरातील पाळीव प्राणी, मांजर, माकड किंवा श्वानदंश झाल्यानंतर रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. महापालिका रुग्णालयांमध्ये प्राणीनिहाय याबाबत वर्गीकरण करण्यात येत नाही. त्यामुळे ही आकडेवारी श्वानदंशाचीच असल्याचे सांगितले जाते. ही बाब अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे भटक्या श्वानांबाबत चुकीची माहिती पसरवून प्रशासन त्यांची जबाबदारी ढकलत आहे. प्रशासनाने प्राणीनिहाय आकडेवारी द्यावी, तसेच प्रत्यक्षात भटक्या श्वानांची आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करावी, अशी मागणी श्वानप्रेमींकडून होत आहे.
पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे
प्राणी क्रूरता अधिनियम १९६० चा ११ (१) तसेच बीएनएस ३२५ (पूर्वीचा भारतीय दंड विधान कलम ४२८/४२१) अन्वये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत १५२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात पिंपरी पोलिस ठाण्यात १०४, संत तुकारामनगर ३, चिंचवड ६, भोसरी ३, सांगवी २, दापोडी ३, वाकड ७, काळेवाडी १, हिंजवडी १२, देहूरोड १०, रावेत ५, तळेगाव दाभाडे ३, शिरगाव ९, तळेगाव एमआयडीसी ४, चाकण ६२, दिघी ६, आळंदी ३, चिखली २, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहेत.
भटक्या श्वानांसाठी महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, प्रशासन चुकीची माहिती देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहे. भटक्या श्वानांवर हल्ले होतात. हे प्रकार थांबले पाहिजेत. जखमी, आजारी श्वानांवर उपचारासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. - कुणाल कामत, श्वानप्रेमी, सांगवी