तळेगाव दाभाडेत १८ जागांवर बिनविरोध;निवडणुकीमुळे मतदानाची हवी थंडावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:27 IST2025-12-04T13:27:11+5:302025-12-04T13:27:33+5:30
- मतदानामध्ये मोठी घसरण : नगरसेवक बिनविरोध न रुचल्याचे चित्र, स्पर्धेचा अभाव आणि मतदार यादीतून नावेच गायब, गोंधळाचा परिणाम मतदान टक्केवारीवर

तळेगाव दाभाडेत १८ जागांवर बिनविरोध;निवडणुकीमुळे मतदानाची हवी थंडावली
- विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत तब्बल १८ जागा बिनविरोध निवडून आल्याच्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर तळेगावकर मतदारांनी मात्र मतदानाबाबत स्पष्ट उदासीनता दाखवली. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये सर्वांत कमी मतदान तळेगावमध्ये झाल्याची नोंद झाली. बिनविरोध निवडणुका मतदारांना न रुचल्याचे चित्र ठळकपणे पुढे आले आहे.
अनेक मतदार नाव तपासण्यासाठी आले; पण मतदारयादीत स्वत:चेच नाव गायब झाल्याचे पाहून त्यांना परत जावे लागले. ‘नाव नाही, तर मतदान कसे करू?’ या प्रश्नासमोर मतदारांनाही आणि कर्मचाऱ्यांनाही काही सांगण्यासारखे राहिले नाही. या गोंधळाचा सरळ परिणाम मतदान टक्केवारीवर झाला. बिनविरोध निवडणुका झाल्याने स्थानिक पातळीवरील स्पर्धा, मुद्दे आणि प्रचाराचा पुरेसा रंग दिसला नाही. त्यामुळे मतदारांचा उत्साह कमी झाला. त्यातच मतदारयादीतील त्रुटीमुळे खचलेल्या मन:स्थितीने अनेकांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.
जोशात घट
प्रशासनाने जनजागृतीचे प्रयत्न केले, बूथवर सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरीही दोन अडथळ्यांनी मतदानाची हवा थंडावली. एक म्हणजे स्पर्धेचा अभाव आणि दुसरे म्हणजे अनेकांची नावे मतदार यादीतून गायब होणे. परिणामी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला या निवडणुकीत केवळ कमी मतदानच नव्हे, तर लोकशाहीच्या जोशात घट झाल्याचा अनपेक्षित शिक्का मिळाला. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती लोकशाहीच्या सहभागाबाबत गंभीर चर्चा निर्माण करत आहे.
सर्वांत जास्त म्हणजे ६२.८४ टक्के मतदान
तळेगाव दाभाडेत एकूण ६४,६७९ मतदार आहेत. त्यापैकी नगरपरिषद निवडणुकीत पुरुष मतदार १६,५५५, महिला मतदार १५,२९१ अशा एकूण ३१,८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगरसेवकांची निवडणूक होत असलेल्या प्रभाग ३ अ, ब मध्ये ५८.०५ टक्के मतदान, प्रभाग क्र. ५ अ मध्ये ५०.५६ टक्के तर प्रभाग क्र. १० अ मध्ये सर्वांत जास्त म्हणजे ६२.८४ टक्के मतदान झाले. नगरसेवकांनी निवडणूक लढविलेल्या प्रभागात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मात्र, ज्या प्रभागात नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत, अशा प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून येते.
प्रभाग ९ मध्ये सर्वांत कमी मतदान
प्रभाग क्र. ९ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ४२.१९ टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. १ मध्ये ४२.७४ टक्के, प्रभाग क्र. २ मध्ये ४३.१३ टक्के , प्रभाग क्र. ६ मध्ये ४४.९३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.