आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची वाट बिकट; वारकऱ्यांची सुरक्षा रामभरोसे; जीव मुठीत धरून चालवं लागतंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:59 IST2025-11-14T18:59:12+5:302025-11-14T18:59:22+5:30
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला

आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची वाट बिकट; वारकऱ्यांची सुरक्षा रामभरोसे; जीव मुठीत धरून चालवं लागतंय
चाकण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीसाठी पुणे, नाशिक आणि जुना पुणे-मुंबई महामार्गाने आळंदीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सतत वाहतूक करणाऱ्या या महामार्गावर वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून जपून चालावे लागत असल्याचे दिसत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीकडे पायी वारी सुरू आहे. मात्र, ११ कार्तिक, मंगळवारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जाहीर झाला आहे. श्रीक्षेत्र आळंदीकडे पायी पालखी दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी असतो, त्याच्या मागे टाळकरी आणि विणेकरी, त्यापुढे तुळशी वृंदावन सोडलेल्या महिला आणि भाविकांचा समावेश असतो. पताकाधारी चालत असल्याने दिंडीही त्या क्रमाने चालू असते.
महामार्गावरील सततची प्रचंड वाहतूक कोंडी आणि विरुद्ध दिशेने येणारी सुसाट वाहने यामुळे वारकऱ्यांना पायी चालायला देखील रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे दिंड्यांतील वारकऱ्यांवर अपघाताचा धोका कायम आहे. आळंदी कार्तिकी यात्रेच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने चर्चेत येत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याने कार्तिकी दिंडीची वाट बिकट आणि अपघाती ठरत आहे. पंढरपूर पालखी मार्गावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गांवर साधी रस्ते सुरक्षितता आणि तात्पुरत्या सुविधा पुरवत नाही, याबाबत वारकरी खंत व्यक्त करत आहेत.
दिंडीमधील वारकऱ्यांची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जाते; मात्र बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकारकडून घेतली जात नाही, याची खंत वाटते. दिंडी मार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे हभप मुक्ताजीदादा नाणेकर, चाकण यांनी म्हटले आहे.