स्मार्ट सिटीच्या बसेसना विद्रुपीकरणाचे ग्रहण; प्रशासनाची अनधिकृत जाहिरातदारांना खुली सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:12 IST2026-02-11T20:12:01+5:302026-02-11T20:12:33+5:30
मिडी बस ठरताहेत ‘सॉफ्ट टार्गेट’, खिडक्या, सीट आणि दरवाज्यांवर पोस्टर्सचा सुळसुळाट; सार्वजनिक मालमत्तेची ऐशीतैशी

स्मार्ट सिटीच्या बसेसना विद्रुपीकरणाचे ग्रहण; प्रशासनाची अनधिकृत जाहिरातदारांना खुली सूट
आकाश झगडे
पिंपरी :पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची जीवनवाहिनी समजली जाणारी पीएमपी बस अनधिकृत जाहिरातींच्या गर्तेत आहे. विशेषतः शहराच्या अरुंद रस्त्यांवर धावणाऱ्या मिडी बस जाहिरातींचे चालते-फिरते फलक बनल्या असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले. या अनधिकृत पोस्टरबाजीमुळे बसचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यातील मोठ्या बसेसच्या तुलनेत मिडी बसमध्ये पोस्टर चिकटवण्याचे प्रमाण जास्त आहे. बसच्या काचा, सीटच्या मागील बाजू, अगदी दरवाजांवरही खासगी क्लास, वशीकरण, दारू सोडवा, रिअल इस्टेट आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. आगारात बस उभी असताना किंवा प्रवासादरम्यान हे पोस्टर्स लावले जातात. मात्र, सुरक्षा रक्षक किंवा वाहक रोखत का नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुने पोस्टर्स फाडल्यानंतर त्याचे अवशेष बसच्या पत्र्यावर तसेच राहतात. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा असतानाही अशा किती अनधिकृत पोस्टरबाजीवर कारवाई करण्यात आली याची आकडेवारी प्रशासनाकडे नाही.
महसूल बुडतोय, विद्रुपीकरण वाढतेय
पीएमपी प्रशासन अधिकृत जाहिरातींतून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे या अनधिकृत पोस्टरबाजीमुळे संस्थेचा हक्काचा महसूलही बुडत आहे. फुकटात जाहिरातबाजी करणाऱ्या या टोळ्यांवर लगाम लागला पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
माहिती घ्यावी लागेल...
याबाबत पीएमपी प्रशासनाला विचारले असता ‘माहिती घ्यावी लागेल’ असे उत्तर मिळाले. याआधी काही अनधिकृत जाहिरातदारांवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. मात्र, त्याचा नेमका आकडा मिळू शकला नाही.
नियमित प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया
आम्ही प्रवासासाठी पूर्ण तिकीट काढतो, मग आम्हाला अशा विद्रुप आणि घाणेरड्या बसमधून प्रवास का करावा लागतो, स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणारे प्रशासन साधी बस स्वच्छ ठेवू शकत नाही का, असा सवाल नियमित प्रवासी विचारत आहेत. प्रवाशांच्या मते, खिडक्यांवर लावलेल्या पोस्टर्समुळे जाहिरातींमुळे बसचे सौंदर्य बिघडत आहे.