पाच सराईतांकडून सात पिस्तूल, सहा काडतुसे जप्त;धुळे येथून आणली होती शस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:34 IST2025-12-14T17:33:50+5:302025-12-14T17:34:22+5:30
- निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पाच सराईतांकडून सात पिस्तूल, सहा काडतुसे जप्त;धुळे येथून आणली होती शस्त्रे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सात पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करून पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. ही अवैध शस्त्रे धुळे जिल्ह्यातून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुहास उर्फ पिल्या बालाजी गायकवाड (वय २७, रा. घरकूल, चिखली), अभय विकास सुरवसे (२७, रा. पिंपळे गुरव), ओमकार सिद्धेश्वर बंडगर (२१, रा. उमरगा, जि. धाराशिव), समीर लक्ष्मण इजगज (२७, रा. मारुंजी) आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन (२५, रा. सोलू, ता. खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत चिखलीमध्ये सुहास उर्फ पिल्या, अभय सुरवसे, ओमकार बंडगर यांच्याकडून दोन लाखांची चार पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि ४० हजारांची दुचाकी जप्त केली. दुसऱ्या कारवाईत वाकडजवळ समीर इजगजकडून एक लाखाची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. तिसरी कारवाई आळंदीच्या हद्दीत केली. यात धर्मेंद्र सेनकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. एकूण पाच लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यातील जप्त केलेली शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणि कुणासाठी आणली होती, याचा तपास सुरू आहे.
अवैध शस्त्र बाळगणारे रडारवर
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत सध्या निवडणुकांचा हंगाम आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. यात अवैध शस्त्र बाळगणारेही रडारवर आहेत.