डोक्यावर पावसाचे ढग… तरीही नळ कोरडे; रूपीनगर परिसरामध्ये टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:27 IST2025-10-30T16:26:38+5:302025-10-30T16:27:08+5:30
निगडी : मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह शहरात पाऊस होत असतानाही रूपीनगर परिसरातील नागरिकांना अद्यापही टँकरवरच अवलंबून राहावे लागते. डोक्यावर ...

डोक्यावर पावसाचे ढग… तरीही नळ कोरडे; रूपीनगर परिसरामध्ये टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
निगडी : मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह शहरात पाऊस होत असतानाही रूपीनगर परिसरातील नागरिकांना अद्यापही टँकरवरच अवलंबून राहावे लागते. डोक्यावर पावसाचे ढग आणि रस्त्यांवर पाणी साचलेले असताना घरातील नळ मात्र कोरडेच आहेत. या विडंबनात्मक परिस्थितीने रूपीनगरमधील नागरिक वैतागले असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रूपीनगर परिसरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे, तर काही भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होते आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी मागवावे लागत आहे.
“ गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होत आहे. आम्ही नक्की स्मार्ट सिटी मध्ये राहतो का ? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. रोजच्या स्वयंपाक, धुणीभांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागते. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. - बप्पा बेदरे, स्थानिक रहिवासी
“रूपीनगर परिसरात कमी दाबाने पाणी, तसेच नागरिकांना होणारी पाणी समस्या हे दुर्दैवी आहे. टँकर पुरवठ्यावरचा हा तात्पुरता तोडगा न राहता कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. रूपीनगरकरांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर न सोडविण्याल्यास महिलांचा हंडा मोर्चा काढणार आहे ” - अस्मिता भालेकर, सामाजिक कार्यकर्त्या